भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) शुक्रवारी दक्षिण आशियाई उपग्रहाचे (जीसॅट-९) अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोच्या जीएसलव्ही एफ-०९ या प्रक्षेपकाच्या मदतीने जीसॅट-९ ने आकाशात झेप घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘इस्रो’च्या या कामगिरीचे कौतूक केले आहे. दक्षिण आशियाई उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा हा क्षण ऐतिहासिक आहे. त्यामुळे सहकार्याच्या कक्षा रुंदावतील, असे मोदींनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सहकार्य केल्याबद्दल आशियाई राष्ट्रांच्या प्रमुखांचेही कौतूक केले. सर्व देशांच्या प्रमुखांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रक्षेपण सोहळा पाहिला. त्यांच्या सहभागामुळे हा आनंदाचा क्षण नेहमीच आशियाई देशांच्या स्मृतीत राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण अशियायी भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत आणि परस्परांत संपर्क उपलब्ध व्हावा असा आहे. या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच, काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देईल. याशिवाय देशांना संकटकाळी एकमेकांना माहिती पाठवण्यास मदत करील, असे इस्त्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दक्षिण आशियातील सात देश जीसॅट-९ उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये भारतासह श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदीवचा समावेश आहे. पाकिस्तानचा या उपक्रमात सहभाग नाही. आपल्याकडे स्वतंत्र अंतराळ कार्यक्रम असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. या उपग्रहामुळे संदेशवहन सेवेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन कार्यातदेखील जीसॅट-९ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. दक्षिण आशियातील देशांमधील संपर्क व्यवस्था एका वेगळ्या उंचीवर नेण्यात जीसॅट-९ मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास ‘इस्रो’कडून व्यक्त करण्यात आला आहे. जीसॅट-९ च्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा असेल.

मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इस्रोकडून सार्क उपग्रह विकसित करण्याचे काम सुरू झाले होते. हा उपग्रह भारताकडून शेजारच्या देशांना भेट दिला जाऊ शकेल, असा त्यांचा विचार होता. ३० एप्रिल रोजी मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात दक्षिण आशिया उपग्रह हा शेजारच्या देशांना भारताकडून अमूल्य भेट असेल, असे जाहीर केले होते.

दक्षिण आशियाई उपग्रहाची (जीएसटी-९) वैशिष्ट्ये

उपग्रहाचे वजन २२३० किलो

उपग्रहाचा कार्यकाल १२ वर्षांपेक्षा जास्त

जीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण

जीएसएलव्हीमध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन

स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केलेले ‘जीएसएलव्ही’चे सलग चौथे यशस्वी उड्डाण

आत्तापर्यंत जीएसएलव्ही प्रक्षेपकाची दहापैकी पाच उड्डाण अयशस्वी ठरल्याने जीएसएलव्हीला नॉटी बॉय ( naughty boy ) म्हणूनही ओळख