भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) जीसॅट ६ या उपग्रहाचे गुरूवारी सतीश धवन अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा अत्याधुनिक दळणवळण उपग्रह म्हणून जीसॅट- ६ कडे पाहिले जात होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरूवारी दुपारी ४.५२ मिनिटांनी हा उपग्रह आकाशात सोडण्यात आला. जीसॅट मालिकेतील हा बारावा उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ नऊ वर्षे आहे. एस बँड व सी बँड वापरकर्त्यांना या उपग्रहाच्या सेवेचा लाभ होणार आहे. या उपग्रहाचे वजन २११७ किलो असून त्यात ११३२ किलो इंधने व ९८५ किलो वजनाच्या मूळ उपग्रहाचा समावेश आहे. या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास सहा मीटर आहे. काल ११.५२ वाजता या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटगणती सुरू झाली होती.