जीएसटीअंतर्गत सर्वाधिक कर लावण्यात आलेल्या वस्तू आता स्वस्त होऊ शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. जीएसटी अंतर्गत २८ टक्के कर आकारल्या जाणाऱ्या ८० टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाणार असल्याचे सुशील मोदींनी म्हटले. या सर्व वस्तूंवर १८ टक्के कर आकारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जीएसटीमुळे व्यापारी वर्गात मोठी नाराजी आहे. त्यातच विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या गुजरातमध्ये व्यापारी वर्गाचे प्रमाण मोठे आहे. त्याच पार्श्वभूमीवर २८ टक्के जीएसटी आकारला जाणाऱ्या वस्तूंवरील कर कमी केला जाण्याची शक्यता आहे.

सध्या एकूण २२७ वस्तूंवर २८ टक्के इतका जीएसटी आकारला जातो. याबद्दल सुशील मोदींनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘गुरुवारपासून जीएसटी परिषदेच्या बैठकीला सुरुवात होत आहे. २८ टक्के जीएसटी असलेल्या ८० टक्के वस्तूंवर यापुढे १८ टक्केच जीएसटी आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो. याशिवाय १८ टक्के कराच्या टप्प्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश १२ टक्क्यांच्या टप्प्यात करण्यात यावा, अशी शिफारसदेखील करण्यात आली आहे,’ असे मोदींनी सांगितले. ते बिहार चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी खाद्य, टेक्स्टाईल, बांधकाम व्यवसाय आणि अन्य क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

२८ टक्के जीएसटी असलेल्या ८० टक्के वस्तूंचा समावेश १८ टक्क्यांच्या टप्प्यात झाल्यास व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. आतापर्यंत जीएसटी परिषदेने १०० हून अधिक वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला आहे. आज आणि उद्या (९ आणि १० नोव्हेंबर) आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत कर कपातीचा निर्णय घेतला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.