News Flash

खवय्यांना दिलासा, खानपान स्वस्त; जीएसटीत घसघशीत कपात

च्युइंगगम, चॉकलेट, सौंदर्यप्रसाधने, शॅम्पूही स्वस्त

शुक्रवारी गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक पार पडली.

वस्तू आणि सेवा कराच्या बोजामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना आणि छोट्या उद्योजकांना केंद्र सरकारने शुक्रवारी दिलासा दिला. तब्बल १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय पाच टक्के कर असलेल्या सहा वस्तूंवरील जीएसटी हटवण्यात आला आहे. या बैठकीतील सर्वात महत्त्वाची म्हणजे बाब हॉटेलमधील जीएसटीत घसघशीत कपात करण्यात आली आहे.

जीएसटीवरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीत सरकारला जीएसटीचा फटका बसण्याची चिन्हे होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जीएसटी करप्रणालीत झालेल्या बदलांविषयी माहिती दिली.

यापूर्वी एसी हॉटेलवर १८ टक्के तर नॉन एसी हॉटेलवर १२ टक्के जीएसटी होता. आता हे प्रमाण थेट पाच टक्क्यांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे खवय्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर तारांकित हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये १८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.
खानपान सेवा स्वस्त करतानाच केंद्र सरकारने च्युइंगगम, चॉकलेट, सौंदर्यप्रसाधने, शॅम्पू, डिओडोरन्टस, कपडे धुण्याचा साबणचुरा, ग्रॅनाइट, संगमरवर आदी उत्पादनांवर २८ ऐवजी १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला. कपडे धुण्याचे यंत्र, वातानुकूलन यंत्र, शीतकपाट, सिमेंट, रंग, तंबाखू उत्पादने या उत्पादनांवर २८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.

जीएसटी भरण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडातही कपात झाली आहे. याआधी दिवसामागे २०० रुपये दंड आकारला जात होता तो आता दररोज २० रुपये एवढाच राहणार आहे, असे जाहीर करत सरकारने केंद्र सरकारने छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा दिला.

या उत्पादनांवरील जीएसटी २८ वरुन १८ टक्क्यांवर 

इलेक्ट्रीकल बोर्ड, पॅनल, प्लायवूड, लाकडी फ्रेम, पेव्हींग ब्लॉक, फर्निचर, ट्रंक, सुटकेस, हँडबॅग, शेव्हींग क्रीम, फॅन, पंप, लॅम्प, टाईल्स,घड्याळ, प्रिंटर, बुलडोझर रोडरोलर, आदी उत्पादनांवर आता १८ टक्के जीएसटी आकारण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 10:43 pm

Web Title: gst council meeting eating out restaurants chewing gum chocolates shampoo washing powder become cheaper arun jaitley
टॅग : Arun Jaitley
Next Stories
1 पाकिस्तान नरमले, कुलभूषण जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी
2 भारतावर ‘गब्बर सिंग टॅक्स’ लादू देणार नाही : राहुल गांधी
3 हिंदूंना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Just Now!
X