केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आसाम येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी कररचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यानुसार दैनंदिन वापरातील १७७ वस्तूंवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. तर ५० वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी जीएसटी परिषदेने १०० हून अधिक वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला होता. जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये डिओ, शॅम्पू आणि सौंदर्य प्रसाधनांचा समावेश आहे. तर २८ टक्के इतका कर कायम ठेवण्यात आलेल्या वस्तुंच्या यादीत तंबाखू, सिगारेट आणि चैनीच्या गोष्टींचा समावेश आहे. अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आणि २४ राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत गुवाहटी येथे आज जीएसटी परिषदेची बैठक झाली. जीएसटी लागू झाल्यानंतर या नव्या करप्रणालीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.