भारतीय जनता पक्ष आगामी गुजरात निवडणुकीत १५० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ‘जीएसटी’ हे व्यापाऱ्यांसाठी ओझे नसून आशीर्वाद असल्याची बाब वर्षभरात त्यांच्या लक्षात येईल, असेही शहा यांनी म्हटले.

गुजरात निवडणुकीसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात शहा बोलत होते. जीएसटीमधील त्रूटी दूर करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घातले असून लवकरच सर्वांसाठी याचे चांगले परिणाम दिसून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुजरातमधील भाजपने केलेल्या कार्याचा दाखला देताना शहा म्हणाले, राज्यातील अनेक भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात भाजपचा मोठा वाटा आहे. विशेषत: कच्छ आणि सौराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न भाजप सरकारने सोडवला आहे.

गुजरात मॉडेलवर बोलताना शहा म्हणाले, गुजरातमधील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. देशाचे पंतप्रधान हे गुजरातचे आहेत, त्यामुळे त्यांचे गुजरातकडे विशेष लक्ष असणार आहे. काँग्रेसकडून गुजरात मॉडेलवरुन टीका सुरु असताना त्याला उत्तर देताना शहा म्हणाले, काँग्रेसने पहिल्यांदा राहुल गांधींचा मतदारसंघ अमेठीची अवस्था पाहावी. देशातील १२५ कोटी जनतेला रोजगार पुरवणे शक्य नाही. त्यासाठी स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचा सोशल मीडियावरील वावर वाढल्याबद्दल प्रतिक्रिया देताना शहा म्हणाले, सोशल मीडियात केवळ वावर वाढवण्यापेक्षा तुमची लोकप्रियता किती वाढली आहे, हे जास्त महत्वाचे आहे. काँग्रेसचा सोशल मीडियातील वावर हा भारतात वाढला की, परदेशात असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुका या ९ आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत होणार असून १८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसोबत गुजरात निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.