नवीन वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीनुसार गुरूवारी जीएसटी परिषदेने एकूण १,२११ वस्तूंचे दर निश्चित केले. यात अधिककरून वस्तूंचा १८ टक्के करात समावेश करण्यात आला आहे, तर सोनं आणि सिगारेटवरील कर अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही.

”जीएसटी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत दर निश्चिती करण्यात आलेल्या वस्तूंवरील करात कोणताही वाढ करण्यात आलेली नाही. याउलट यातील अनेक वस्तूंवरील कर कमी झाले आहेत.”, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. नवी दिल्लीत आज जीएसटी परिषदेची पहिली बैठक झाली. बैठकीत एकूण १,२११ वस्तूंचे दर जीएसटीनुसार निश्चित करण्यात आल्याचे जेटली म्हणाले.

कराचा एकूण बोझा कमी झाल्याने बाजारात उत्साही वातावरण पाहायला मिळेल अशी आशा जेटली यांनी व्यक्त केली. तब्बल ४०० वस्तू सध्या पूर्वीच्या अबकारी आणि वॅटमधून वगळण्यात आले आहेत. आज चर्चा झालेल्या वस्तूंमध्ये ८१ टक्के वस्तूंवर १८ टक्के आणि त्याहून कमी कर लावण्यात आला आहे. केवळ १९ टक्के वस्तूंवर सर्वाधिक २८ टक्के कर निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, जीएसटी परिषदेची शुक्रवारी पुन्हा एकदा बैठक होणार असून यात विविध विभागातील सेवांवरील कर निश्चित केला जाणार आहे.

> दूध जीएसटीमधून वगळण्यात आलं आहे.

> तृणधान्यांवर याआधी ५ टक्के कर होता. जीएसटीत तृणधान्यं देखील वगळण्यात आली.

> अन्नधान्य स्वस्त होणार

> हेअर ऑईल, साबण, टूथपेस्टवर १८ टक्के कर

> कोळश्यावर ५ टक्के कर निश्चित करण्यात आला आहे. सध्या कोळश्यावर तब्बल ११.६९ इतका कर आहे.

> साखर, चहा, कॉफी, खाद्यतेलावर ५ टक्के कर