देशभरात उद्यापासून बहुचर्चित जीएसटी GST लागू होणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी संसदेत मध्यरात्री खास सोहळा आयोजित केला आहे. सोहळा सुरू होण्यास काही तासच उरले आहेत. त्याआधीच जीएसटीच्या या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर ‘व्हिडिओ बॉम्ब’ टाकला आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीची अंमलबजावणी अशक्य असल्याचं मत एका कार्यक्रमादरम्यान मांडलं होतं. त्यावेळचा व्हिडिओ काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मोदीजी, तुम्ही तुमचेच शब्द इतक्या लवकर कसे विसरलात, असा सवालही काँग्रेसने केला आहे.

जीएसटीची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. त्याची जय्यत तयारी भाजप सरकारनं केली आहे. संसदेत एका खास सोहळ्याचं आयोजन केलं आहे. त्यात उद्यापासून जीएसटी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रपती करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. अनेक दिग्गज नेते, वरिष्ठ अधिकारी, सेलिब्रिटींना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. पण काँग्रेसनं या जीएसटी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काँग्रेसनं आता जीएसटीवरून भाजप आणि मोदींना लक्ष्य करण्याचं ठरवलं आहे. जीएसटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काय मत होतं, याचा व्हिडिओच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. जीएसटीसंबंधी गुजरात सरकार आणि भाजपची भूमिका अधिक स्पष्ट आहे. देशभरात करदात्यांसह माहिती तंत्रज्ञानातील पायाभूत सुविधांचा विकास जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत जीएसटीच्या अंमलबजावणीचे स्वप्न साकार होणे कठिण आहे. जीएसटीची अंमलबजावणी शक्य नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. हा व्हिडिओ शेअर करून काँग्रेसने मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी आपलेच शब्द कसे विसरतात, असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या या ‘व्हिडिओ बॉम्ब’ला भाजप कोणत्या शब्दांत उत्तर देतं, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.