संसदेचा सेंट्रल हॉल शुक्रवारी मध्यरात्री एका ऐतिहासिक राजकीय घटनेचा साक्षीदार ठरला. एकीकडे वस्तू व सेवा कर कायद्याच्या (जीएसटी) अंमलबजावणीच्या रूपाने देश आर्थिक कूस पालटत असतानाच सेंट्रल हॉलमध्ये देशातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळाली. या सोहळ्यास राजकीय नेत्यांपासून अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होती. मात्र या सर्वांमध्ये लालकृष्ण अडवाणी, शरद पवार, अमित शहा या त्रिकूटाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

जीएसटी विधेयकाच्या सोहळ्याला सत्ताधारी भाजपने सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केले होते. मात्र, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या कार्यक्रमाला अपेक्षेप्रमाणे ते अनुपस्थित राहिले. मात्र, यापक्षांसोबत काही काळ सत्ता उपभोगलेल्या शरद पवार यांना या कार्यक्रमाला हजेरी तर लावलीच. पण ते थेट भाजप श्रेष्ठींच्या मांडीला माडी लावून बसले. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले. या कार्यक्रमात अडवाणी, पवार आणि शहा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकाच रांगेत बसले होते.  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पवार आणि अडवाणी यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगली होती. पवार यांनी खुद्द राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. अमित शहा यांनी एनडीएकडून कोविंद यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर पवार यांनी आपल्याला अडवाणी यांच्या नावाची अपेक्षा असल्याचे प्रतिक्रिया दिली होती.