संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी वस्तू आणि सेवा कर कायदा देशात लागू झाल्याची घोषणा केली आणि देशामध्ये मध्यरात्रीच्या ठोक्याला नव्या करप्रणालीचा सूर्योदय झाला. स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी करसुधारणा मानली जाणारी, देशातील असंख्य करांना एकत्रित करणारी वस्तू व सेवा करप्रणाली शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली. ‘चौदा वर्षांच्या प्रवासाचा परमोत्कर्ष’ अशा शब्दांत या करप्रणालीचे स्वागत करतानाच राष्ट्रपतींनी पुढच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांचीही यावेळी जाणीव करून दिली. हे अडथळे आपणांस वेगाने दूर करावे लागतील. किती परिणामकाररित्या आपण या करप्रणालीची अंमलबजावणी करतो त्यावर तिचे यश अवलंबून असेल असे ते म्हणाले.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांचे भाषण झाले. ‘या घडीला आपण राष्ट्रनिर्मितीच्या नव्या वळणावर येऊन ठेपलो आहोत. एका नवव्यवस्थेकडे आपण वाटचाल करत आहोत. हे यश कोण्या एका पक्षाचे किंवा सरकारचे नाही, तर हा आपल्या सामुदायिक प्रयत्नांचा परिपाक आहे,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. जीएसटीचे महत्त्व विषद करताना त्यांनी राज्यघटनेचे उदाहरण दिले. राज्यघटनेने देशवासीयांना समान संधी प्राप्त करून देण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे जीएसटी देशातील सर्व राज्यांत समान करव्यवस्था आणत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे विलिनीकरण करून देश एक केला त्याप्रमाणे जीएसटीच्या माध्यमातून देशाचे आर्थिक एकीकरण होत आहे, असेही ते म्हणाले. कोणत्याही व्यवस्थेत स्थित्यंतर होत असताना थोडा त्रास होतो. तसा तो याही वेळी होईल. मात्र त्याने विचलित न होता ही मार्गक्रमणा नेटाने सुरू ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. या करप्रणालीतून कर दहशतवाद आणि इन्स्पेक्टर राज संपुष्टात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर ‘मध्यरात्रीच्या ठोक्याला देशात अमर्याद शक्यतांचा उदय’ झाला असल्याची भावना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली.  या समारंभास उद्योगपती रतन टाटा यांच्यासह देशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसने मात्र या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.  वस्तू व सेवा कररचनेतील वस्तू करामुळे व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी नवीन यंत्रणा अस्तित्वात येणार असून माहिती तंत्रज्ञानाच्या मंचावर त्यांना अद्ययावत व्यवसाय नोंदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वार्षिक २० लाख रुपयांखालील उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना या रचनेबाहेर ठेवण्यात आले आहे.

व्हिडिओ पाहा…मोदीच म्हणाले होते, ‘GSTची अंमलबजावणी अशक्य’

वस्तू व सेवा करप्रणालीत समाविष्ट सेवा कराचे प्रमाण थेट ३ टक्क्यांनी वाढवून १८ टक्क्यांपर्यंत नेऊन ठेवण्यात आल्यामुळे हॉटेलमधील खानपान, मोबाइलचे मासिक देयक ते विम्याचे हप्ते, म्युच्युअल फंडांचे व्यवहारासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे. मात्र महत्त्वाचे खाद्यजिन्नस शून्य तसेच ५ टक्के कराच्या टप्प्यात आणले गेल्याने अन्नपदार्थाबाबत दिलासा मिळाला आहे. ५, १२, १८ व २८ टक्के अशा चार टप्प्यांतील वस्तू व सेवा करामुळे उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर, मनोरंजन कर, प्रवेश कर, सेवा कर असे केंद्र तसेच राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आकारले जाणारे कर एकाच संरचनेत येणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असल्याचा सरकारकडून दावा केला जात असला तरी देशाच्या अर्थविकासात २ टक्के भर पडेल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

ठळक घडामोडी :

* राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जीएसटीचे लाँचिंग

* राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या भाषणाला सुरुवात
* पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण संपले
* जीएसटीमुळे भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्तम सुविधा: नरेंद्र मोदी
* जीएसटीमुळे काळापैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल: नरेंद्र मोदी
* जकात नाक्यावरचे कित्येक तास आता जीएसटीमुळे वाचतील: नरेंद्र मोदी
* जीएसटी म्हणजे गुड अँण्ड सिंपल टॅक्स- नरेंद्र मोदी
* जीएसटी केवळ आर्थिक संकल्पनांपुरता मर्यादित नाही, यामुळे गरिबांचा मोठा फायदा होईल- नरेंद्र मोदी
* जीएसटीमुळे देशातील सर्व राज्यांना विकासाची समान संधी उपलब्ध होईल- नरेंद्र मोदी
* जीएसटीमुळे व्यापारातील असंतुलित परिस्थिती संपुष्टात येईल- नरेंद्र मोदी
* जीएसटीबाबत अफवा पसरवू नका; जीएसटीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करा- नरेंद्र मोदी
* कोणत्याही गोष्टीवर सातत्याने शंका उपस्थित करू नका- नरेंद्र मोदी
* पाया जितका विस्तारेल तितकी उंची वाढण्यास मदत होते- नरेंद्र मोदी
* ५०० विविध कर जाऊन देशभरात एकच करप्रणाली लागू होणार- नरेंद्र मोदी
* गीतेमध्ये १८ अध्याय असतात आणि जीएसटी समितीच्याही आतापर्यंत १८ बैठका झाल्यात- नरेंद्र मोदी
* जीएसटी हे केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा सरकारचे यश नव्हे, हे आपल्या एकत्रित प्रयत्नांचे यश- नरेंद्र मोदी
* भारत सहकार्यावर उभारलेल्या लोकशाहीचा झळाळता बिंदू- नरेंद्र मोदी
* जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची मोठी संधी: नरेंद्र मोदी
* जीएसटीच्या प्रक्रियेला मदत केलेल्या सर्वांचे आभार: नरेंद्र मोदी
* राष्ट्राच्या निर्मितीत काही खास क्षण नव्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारे असतात; १२५ कोटी जनता आजच्या या क्षणाची साक्षीदार- नरेंद्र मोदी
* आज मध्यरात्री आपण देशाची पुढील वाटचाल निश्चित करणार आहोत- नरेंद्र मोदी
* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरूवात
* केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे भाषण संपले

* केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून जीएसटीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा
* संकुचित राजकारणाच्या मर्यादा ओलांडून देश एकत्र उभा राहू शकतो, हे जीएसटीने दाखवून दिले- अरूण जेटली
* जीएसटीची अंमलबजावणी देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण- अरूण जेटली
* सेंट्रल हॉलमधील ऐतिहासिक सोहळ्याला सुरूवात; केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणाला सुरूवात

* संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रगीताला सुरुवात

* राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सेंट्रल हॉलमध्ये आगमन

* उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सेंट्रल हॉलमध्ये दाखल
* पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सेंट्रल हॉलमध्ये आगमन; ११.१५ वाजता संसदेला संबोधित करणार

* राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सेंट्रल हॉलमध्ये दाखल
* भाजपचे अध्यक्ष अमित शहा सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित
* केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलीही सेंट्रल हॉलमध्ये दाखल
* संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये रतन टाटांचे आगमन

* जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक देशभरातील दुकानांमध्ये सेल; अनेक दुकानांमध्ये उत्पादनांवर ४० टक्क्यांपर्यंत सूट

* ट्रॅक्टर्सच्या पार्ट्सवर आता २८ टक्क्याऐवजी १८ टक्के जीएसटी लागणार; जीएसटी समितीच्या बैठकीत निर्णय
* जीएसटी समितीच्या बैठकीत रासायनिक खतांवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय
* सेंट्रल हॉलमधील सोहळ्यापूर्वी नवी दिल्लीत जीएसटी समितीची १८ वी बैठक संपन्न
* GST rollout in India: जीएसटी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर संसदेची इमारत रोषणाईने उजळली
* संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये थोड्याचवेळात सोहळ्याला होणार सुरूवात.