देशात मे महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) १.०२ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. सलग आठव्या महिन्यात जीएसटीची वसुली एका लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर मर्यादित परिणाम दिसून येत आहे.

मे महिन्यात जीएसटी वसुली १.०२ लाख कोटी रुपये झाली ती एप्रिल २०२१ च्या तुलनेत २७ टक्के कमी आहे. परंतु जेव्हा देशात पूर्ण टाळेबंदी होती तेव्हा म्हणजे मे २०२०च्या तुलनेत ६५ टक्के अधिक आहे.

ग्रॉस जीएसटी महसूल वसुली एक लाख दोन हजार ७०९ कोटी रुपये आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा (सीजीएसटी) हिस्सा १७ हजार ५९२ कोटी रुपये तर राज्यांचा (एसजीएसटी) हिस्सा २२ हजार ६५३ कोटी रुपये आहे आणि आयजीएसटी ५३ हजार १९९ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या २६ हजार ००२ कोटींसह) इतका आहे. सेसच्या रूपात नऊ हजार २६५ कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये ८६८ कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून मिळाले आहेत, असे अर्थमंत्रालयाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे.

मे २०२१ मध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल ५६ टक्के अधिक आहे आणि देशांतर्गत व्यवहारांमधून मिळालेला (सेवा आयातीसह) महसूल मे २०२० पेक्षा ६९ टक्के अधिक आहे.

करोना महासाथीमुळे अनेक राज्यांमध्ये कडक टाळेबंदी असतानाही जीएसटी वसुलीने एक लाख कोटी रुपयांच्या वसुलीचा टप्पा पार केला आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.