भाजपचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये भाजपने ९९ जागांची आघाडी घेतल्याने राज्यात आणि देशात भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र एक गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणजे ऊंझा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात मात्र भाजपची सपशेल हार झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव असलेल्या ऊंझामध्ये मात्र काँग्रेसचीच वर्णी लागली आहे. याठिकाणी भाजपचे नारायण लल्लूदास पटेल, काँग्रेसच्या आशा पटेल, बसपचे घनश्याम सोलंकी आणि आम आदमी पार्टीचे रमेश पटेल मैदानात होते. मात्र याठिकाणी आशा पटेल यांनी भाजपच्या नारायण पटेल यांना मोठ्या फरकाने हरवले आहे.

आशा पटेल यांनी २० हजारांहून अधिक मतांनी याठिकाणी विजय मिळवल्याने भाजपसाठी ही अतिशय खेदाची बाब आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे नारायण पटेल या विधानसभा मतदार संघात मागच्या ५ टर्म म्हणजेच १९९५ पासून जिंकून आले आहेत. यावेळी नारायण पटेल यांचे हे सहावी निवडणूक होती. त्यामुळे आता त्यांचा झालेला पराभव हा भाजपला खऱ्या अर्थान धक्का आहे. या विधानसभा मतदारसंघात याआधी काँग्रेसला १९६२ आणि १९७२ अशी केवळ दोनदाच संधी मिळाली होती. मेहसाणा जिल्ह्यात एकूण ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील १ जागा राखीव आणि ६ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.