देशातील सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण? असा प्रश्न विचारण्यात आला तर वाटू शकते की पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी ही नावे समोर येऊ शकतात. मात्र देशातल्या लोकांना वाटते आहे की देशाचे सर्वोत्कृ्ष्ट पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच आहेत. ‘इंडिया टुडे’ने या संदर्भातला एक सर्वे केला आहे. या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट असल्याचे बहुतांश जनतेने म्हटले आहे. नरेंद्र मोदींना या सर्वेक्षणात २६ टक्के मते मिळाली. इंदिरा गांधी या तीनवेळा देशाच्या पंतप्रधान होत्या, त्यांना मोदींच्या तुलनेत ६ मतं कमी पडली. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना १२ टक्के मते मिळाली आहेत. तर माजी पंतप्रधान पंडित नेहरूंना १० टक्के मते मिळाली आहेत. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहाराव,  माजी पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचीही नावे लोकांनी निवडली आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये क्रमांक १ वर आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लोकांनी ५ व्या क्रमांकावर पसंती दिली आहे. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सातव्या क्रमाकांवर पसंती दिली आहे. हिंदू मतांचा विचार केला तर सर्वाधिक मते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाली आहेत. तर मुस्लिम मतांचा विचार करता सर्वाधिक मते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिळाली आहेत. २८ टक्के हिंदू जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. तर २६ टक्के मुस्लिम बांधवांनी  इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान होत्या असे म्हटले आहे.

विभागवार विचार करता, उत्तर आणि पूर्व भारताने सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती दिली आहे ती नरेंद्र मोदी यांच्याच नावाला. तर पश्चिम भारतातही पहिली पसंती त्यांच्याच नावाला देण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दुसऱ्या क्रमांकावर पसंती मिळाली आहे. दक्षिण भारतातील जनतेने इंदिरा गांधींना पहिली पसंती दिली आहे. इंडिया टुडेने घेतलेल्या या सर्वेचा विचार करता भारतात मोदी लाट कायम आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.