गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाल्यापासूनच अनेक नेतेमंडळींनी भाजपला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. यामध्ये योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाचा समावेश आहे. पर्रिकरांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेवर टीका करत पहिल्याच सामन्यात राहुल गांधी शुन्यावरच बाद झाल्याचे म्हणत भाजपच्या विजयाविषयी आपली प्रतिक्रिया दिली.

पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांपासून ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच केलेली कामं आणि त्यांनी घेतलेली मेहनत या साऱ्यामुळेच हे अद्वितीय यश भाजपच्या वाट्याला आले आहे, असे म्हणत केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपली प्रतिक्रिया दिली. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या सर्वच चांगल्या कामांची जाण गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतदारांनी झाली असल्याचेही त्या म्हणाल्या.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विजयी मुद्रेसह भाजपला मिळालेल्या यशाविषयी आनंद व्यक्त केला. त्यासोबतच त्यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनाही टोला लगावला. भाजपला मिळालेले यश आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेले अपयश याविषयी आपली प्रतिक्रिया देत सिंह म्हणाले, ‘सध्या याविषयी मी काहीच बोलणार नाही, कारण ते (राहुल गांधी) आताच पक्षाच्या अध्यक्षपदी आले आहेत.’ त्याशिवाय, राहुल गांधीनी आम्हाला दिलेल्या आव्हानामुळेच त्यांची फजिती झाली या आशयाची टीकाही त्यांनी केली. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभ-अशुभाचा मुद्दा मांडत एक वेगळाच युक्तिवाद सर्वांसमोर ठेवला.

Gujarat election results 2017 : मशरुम केकने वाढली भाजपच्या यशाची गोडी

समाजात फूट निर्माण करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे, असे म्हणत आदित्यनाथ यांनी आपली काँग्रेसला निशाण्यावर धरले. त्यासोबतच काँग्रेसमध्ये झालेला नेतृत्त्वबदल हा भाजपसाठी शुभसूचक ठरणार असे मी याआधीच म्हणालो होतो, याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.