गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल आता अवघ्या काही क्षणांमध्येच हाती येतील. तत्पूर्वी निकालांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, भाजपला या दोन्ही राज्यांमध्ये आघाडी मिळाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भाजपला मिळालेली आघाडी आणि त्यांच्या वाट्याला येणारे अपेक्षित यश पाहता विविध ठिकाणी असणाऱ्या भाजप कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मध्यप्रदेशमध्ये तर भाजप कार्यकर्त्यांनी ढोकळा आणि फाफडा या पारंपरिक गुजराती खाद्यपदार्थाची चव चाखत हे यश साजरे केले.

ट्विटवर सध्या विविध ठिकाणच्या भाजप कार्यालयांबाहेरील वातावरणाची काही छायाचित्रे पोस्ट करण्यात येत असून, सर्वत्र ‘विकास पॅटर्न’च्या यशाचीच चर्चा होते आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात गुजरातमध्ये भाजपला अपेक्षित आघाडी मिळाली. पण, त्यानंतर मात्र काँग्रेसनेही आघाडी घेतली असून, पंतप्रधान मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींच्या काँग्रेसने जवळपास ७६ जागांवर आघाडी घेतली.

gujarat election results 2017 live गुजरातमध्ये १०७ जागांवर भाजपची आघाडी, काँग्रेस-भाजपची काँटे की टक्कर

हिमाचल प्रदेशातही भाजप नेत्यांनी एकहाती सत्ता येण्याचा दावा केला होता. पण, काँग्रेसच्या वाट्याला आलेली आघाडी पाहता भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे हे नाकारता येणार नाही. पण, तरीही सध्याचे कल आणि कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहता पुन्हा एकदा मोदींची जादू कायम आहे हे दाखवणारे ठरते आहे.