‘विकास नव्हे, तर काँग्रेस पक्ष वेडा झालाय,’ अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिले आहे. राहुल गांधींनी ‘गुजरात मॉडेल’वर प्रश्नचिन्ह उभे करत ‘विकास वेडा झाला आहे’, अशा शब्दांमध्ये भाजपवर अनेकदा प्रहार केला आहे. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही काँग्रेसच्या ‘विकास वेडा झालाय’, या सोशल मीडिया कॅम्पेनला प्रत्युत्तर दिले होते.

गुजरात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे काँग्रेस-भाजपमधील शाब्दिक युद्ध वाढताना दिसत आहे. नोटाबंदी, जीएसटीवरुन काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. याशिवाय सोशल मीडियावर ‘विकास वेडा झालाय,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेसकडून मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’वर प्रश्न उपस्थित केले जात आहे. काँग्रेसच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून केला जात आहे. ‘विकास वेडा झालेला नाही. काँग्रेस पक्ष वेडा झाला आहे. विकास त्याच्या जागेवरच आहे,’ असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. ते भाजपच्या प्रचारासाठी अहमदाबादमध्ये आले होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये आहेत. आज सकाळीच त्यांनी बनासकांठा येथे सोशल मीडिया हाताळणाऱ्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळीही राहुल गांधींनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या विकासाच्या दाव्यांची खिल्ली उडवली. ‘आम्ही नेहमीच सत्य बोलत राहू आणि सत्य हेच आहे की विकास वेडा झालाय,’ असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी याआधीही अनेकदा विकासाच्या दाव्यांवरुन भाजप आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. ‘गुजरातमध्ये विकासाला नेमके काय झाले आहे ? विकास वेडा कसा झाला ? खोटे-खोटे बोलणे ऐकून विकास वेडा झाला,’ असे राहुल गांधींनी गेल्या महिन्यात एका जनसभेला संबोधित करताना म्हटले होते.

काँग्रेसच्या ‘विकास वेडा झालाय’ या कॅम्पेनवर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनीदेखील भाष्य केले आहे. ‘गुजरातमध्ये विकासकामे केली. अनेक प्रकल्प मार्गी लावले. यामध्ये माझे काही चुकले का?’ असा भावनिक प्रश्न मोदींनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना विचारला होता. तर ‘काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचारावर विश्वास ठेऊ नका. स्वत: विचार करुन काँग्रेस आणि भाजपच्या सत्ता काळात झालेल्या कामांची तुलना करा,’ असे आवाहन शहांनी केले होते.