पाटीदार संघटनेच्या समन्वयकाचा टोला

मोदी म्हणजे गुजरात आणि गुजरात म्हणजे मोदी हे समीकरण इतर राज्यांमध्ये वाटत असले तरी नरेंद्र मोदींना गुजरात गेली १५ वष्रे ओळखून आहे. पंतप्रधानपदावरची व्यक्ती खोटे कशी बोलू शकते, याबाबत लोकांना पूर्वी संभ्रम होता, मात्र एवढय़ा वर्षांच्या अनुभवाने लोकांचा गरसमज दूर होत आहे.. पाटीदार संघटनेचा राजकोटमधील समन्वयक हेमांग पटेलने मोदींविषयीच्या भावना अशा शेलक्या शब्दांत व्यक्त केल्या.

हार्दिक पटेलच्या, २९ नोव्हेंबरला झालेल्या महासभेने काँग्रेसला राजकोटमध्ये हात दिला. विशेष म्हणजे या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही ही सभा घडवून आणण्याचे काम केले ते राजकोट शहरातील पाटीदार अनामत आंदोलन समितीचा समन्वयक हेमांग पटेलने. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या सभेप्रकरणी गुन्हा दाखल केला त्यात हार्दिकसोबत हेमांगचेही नाव होते. सौराष्ट्र विद्यापीठात हेमांगशी गाठ पडली, तेव्हा तो अ‍ॅक्टिव्हावरून फिरत होता. बाजूलाच असलेल्या नील सिटी रिसॉर्टमध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी गेले तीन महिने उतरले आहेत. तेथेच बसून त्याच्याशी गप्पा मारल्या. हेमांग राजकोटचा. त्याची आणि हार्दिकची आधी कधी भेट झाली नव्हती. मात्र दोन वर्षांपूर्वी हार्दिकच्या मेहसाणामधल्या पहिल्या सभेने इतरांसारखा हेमांगही प्रभावित झाला. अजूनही शिकत असलेल्या हेमांगला राजकारणात सक्रिय व्हायचे आहे. पाटीदार समाजाने निवडणूक लढवायला हवी होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. यंत्रणेत गेल्याशिवाय ती बदलता येत नाही. मी २४ वर्षांचा असल्याने आता निवडणुकीला उभा राहू शकलो नाही, पण नंतर नक्की सक्रिय राजकारणात जाणार, असे तो बिनदिक्कतपणे सांगतो.  भाजप हा दाक्षिणात्य चित्रपटांसारखा आहे. पाहायला छान वाटते पण त्यातले काहीच वास्तवात येऊ शकत नाही, हे लोकांना कळून चुकले आहे. नरेंद्र मोदींना इथले लोक चांगलेच ओळखतात. पाटीदारांनी गेली २२ वष्रे भाजपला ‘वोट आणि नोट’ दिले. आता त्यांनी एक मागणी केली तर भाजपने तीदेखील पूर्ण केली नाही, असे तो म्हणाला. काँग्रेस तरी आरक्षणाची मागणी पूर्ण करेल असे वाटते का, या प्रश्नावर त्याने सावध प्रतिक्रिया दिली. आरक्षणाची व्यवस्था काँग्रेसनेच आणली आहे. तेच त्याचे जन्मदाते आहेत. त्यामुळे त्यात काय बदल करता येतील, हे त्यांनाच चांगले ठाऊक असणार, असे हेमांगला वाटते.

भाजप आम्हाला घाबरत नाही, तर मग आमच्या सभांना परवानगी का मिळत नाही. प्रत्येक वेळी आमच्यावर गुन्हा दाखल केला जातो. हार्दिक पटेलची सीडी पसरवली गेली. सभेसाठी आम्हाला माणसे गोळा करावी लागत नाहीत. सोशल मीडियावर आम्ही प्रभावी आहोत. ‘विकास गांडो थयो छे’ हे काँग्रेसचे नाही तर आमचे वाक्य आहे. प्रत्येक बुथनुसार भाजपविरोधी वातावरण तयार करणार आणि भाजपला त्यांची जागा दाखवून देणार.

– हेमांग पटेल