नुकताच गुजरात महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत अंथरुणाला खिळलेल्या एका उमेदवाराने विजय मिळवण्याची किमया करुन दाखवली आहे. गोपाळ सोराथिया असे या उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी सक्रिय प्रचारात सहभाग न घेताही जामनगर महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला. गोपाळ सोराथिया या भाजपा उमेदवाराने या निवडणुकीत सोशल मीडियाची ताकत दाखवून दिली आहे.

अंथरुणाला खिळण्याचे कारण काय ?

वॉर्ड क्रमांक ७ मधून जामनगर महापालिका निवडणुकीची तिकिट मिळण्याच्या दोन दिवस आधी गोपाळ सोराथिया यांचा अपघात झाला. दोन्ही पायांना प्लास्टर लागल्यामुळे ते बिछान्यामध्येच होते. मतदाराच्या दारापर्यंत आपल्याला प्रचारासाठी जात येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी सोशल मीडियाला प्रचाराचे मुख्य साधन बनवले व त्या माध्यमातून ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचले.

आणखी वाचा- मोदींच्या गुजरातमध्ये केजरीवालांच्या ‘आप’ ची एन्ट्री

अंथरुणातूनच त्यांनी स्वत:च्या भाषणाचं रेकॉर्डिंग केलं व १० हजार लोकांपर्यत पोहोचवलं. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून ९ हजार लोकांपर्यंत मेसेज पाठवला. ३० हजार मतदारांना एसएमएस पाठवले. प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी-भेठी घेता येत नसल्या, तरी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक पद्धतीने प्रचार धोरणं राबवली.

आणखी वाचा- “राजासारखे वागू नका, जमीनीशी नातं सांगणारं नेता व्हा”, मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला

“उमेदवाराने आपली भेट घ्यावी, अशी मतदारांची भावना असते. पण मला चालता येत नव्हते. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मी सोशल मीडियाचा आधार घेतला. मी नशिबवान आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मला मतदान करा, हे मी त्यांना पटवून देऊ शकलो” असे सोराथिया यांनी सांगितले.

आणखी वाचा- अहमदाबादमधील ‘सरदार पटेल स्टेडियम’चं नामकरण ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’

गोपाळ सोराथिया यांनी २०१५ मध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती. २०१० पासून ते भाजपासाठी काम करत आहेत. ते वॉर्ड नंबर ८ चे रहिवाशी आहेत, पण त्यांना ७ नंबर वॉर्डमधून तिकिट मिळाली. ‘मतदार नवीन होते. पण सोशल मीडियाचा फायदा झाला’ असे त्यांनी सांगितले.