महाराष्ट्रात माफीनाम्यांची मागणी होत असताना हे लोण गुजरातपर्यंत पोहोचलं आहे. ‘संजय राऊत यांनी अहमदाबादचा उल्लेख मिनी पाकिस्तान केल्याप्रकरणी माफी मागावी,” अशी मागणी गुजरात भाजपाने केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सातत्यानं भाष्य करत असलेल्या कंगना रणौतनं मुंबई पोलीस आणि मुंबई बद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. कंगनानं केलेल्या विधानाला उत्तर देताना राऊत यांनी अहमदाबादचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला होता. त्यावरून गुजरात भाजपा आक्रमक झाली आहे.

एका मुलाखतीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर ‘हरामखोर मुलगी’ म्हणून टीका केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेवर अनेकांनी आक्षेप घेत त्यांनी कंगनाची मागावी, अशी मागणी केली. त्यावर जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली, तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन, अशी भूमिका संजय राऊतांनी ‘एएनआय’शी बोलताना मांडली.

आणखी वाचा- १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात असलेल्यांना माझी ताकद विचारा !

“तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं. हेच अहमदाबादबद्दल बोलायची तिच्यात हिंमत आहे का?,” असा सवाल राऊतांनी यांनी केला होता. संजय राऊत यांच्या विधानानंतर गुजरात भाजपानं हा मुद्दा उपस्थित केला आहे. “शिवसेनेच्या नेत्यानं अहमदाबादला ‘मिनी पाकिस्तान’ असे संबोधून राज्याचा अपमान केला आहे. त्यांनी गुजरात, अहमदाबाद आणि अमदाबादवासीयांची माफी मागावी,” असं गुजरात भाजपाचे प्रवक्ते भारत पंड्या यांनी म्हणाले.

आणखी वाचा- तुफानों का रूख…! संजय राऊतांच्या ट्विटवर संबित पात्रा म्हणतात…

“शिवसेनेनं गुजरात आणि तेथील लोकांना बदनाम करण्याची कोणतीही संधी शोधणं थांबवावं. हा गांधीजी आणि सरदार पटेल यांचा गुजरात आहे. सरदार पटेल यांनी ५६२ संस्थानं एकत्र करून भारताचे ऐक्य व अखंडता राखली. जुनागड आणि हैदराबादला पाकिस्तानात जाण्यापासून रोखले. कलम ३७० रद्द करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन्ही नेतेही गुजरातचेच आहेत. त्यामुळे भारताच्या एकता आणि अखंडतेत गुजरातचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे,” असे ते म्हणाले.