गुजरात सरकारने गोहत्येविरोधात सर्वात कठोर कायदा राज्यात लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर राज्यात गोहत्या केल्याप्रकरणी दोषी ठरल्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येईल. राज्य सरकारने मार्च महिन्यात गुजरात पशु संरक्षण विधेयक २०१७ विधानसभेत संमत केले होते. मंजुरीनंतर राज्यपालांकडे हे विधेयक पाठवण्यात आले होते. गुजरातमध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर सध्या असलेली ७ वर्षांची शिक्षा १४ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ७ वर्षांची शिक्षा हटवण्यात आलेली नाही. तीही कायम ठेवण्यात आली आहे. गोहत्ये प्रकरणी दोषी ठरल्यानंतर शिक्षेबरोबर दंडही भरावा लागणार आहे. दोषी ठरल्यास पाच लाख रूपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो. हा कायदा आजपासून राज्यात लागू झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये आगामी निवडणुकीत हिंदू मते खेचण्यासाठी हा कायदा करण्यात आल्याचे बोलले जाते. आता राज्यात गोहत्येचा प्रयत्न केल्यास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी पोलिसांकडून होणारे दुर्लक्षही सहन केले जाणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी दिला.
गायीची तस्करी करताना पकडल्यास होणारी सात वर्षांची शिक्षा वाढवून ती दहा वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये दंडाची रक्कम ५० हजारांवरून ११ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर अवैधरित्या गोतस्करी करणारे वाहनावर बंदी घालण्याचीही तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस एफआयआर नोंद झाल्यानंतर सहा महिन्यानंतर जप्त केलेले वाहन सोडून देण्यात येत होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 8:30 pm