गुजरातमधील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. पण त्याआधीच भाजपाने विजयाचे सेलिब्रेशन सुरु केले आहे. कारण गुजरातमध्ये पोटनिवडणूक होत असलेल्या आठपैकी आठ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

“पोटनिवडणुकांचे हे निकाल म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा हा फक्त एक ट्रेलर आहे” अशी प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडेही सगळयांचे लक्ष आहे. मध्य प्रदेशात २८ तर उत्तर प्रदेशात सात आणि गुजरातमध्ये विधानसभेच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती.

आणखी वाचा- काँग्रेस म्हणजे बुडते जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे ट्रेलर – विजय रुपाणी

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपा गुजरात आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यात चांगली कामगिरी करेल, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात भाजपा पाच ते सहा जागांवर तर गुजरातमध्ये सहा ते सात जागा जिंकेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

यावर्षी जून महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये आठ विद्यमान काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली. आठपैकी पाच जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला व ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.