महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच साताऱ्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकालही २४ ऑक्टोबर रोजी हाती आले. साताऱ्यामधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे उदयनराजेंच्या बाबतीत घडलं तेच गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर यांच्याबाबतीत घडले आहे.
गुजरातमधील विधानसभेच्या सहा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सहा पैकी तीन जागांवर भाजपाने तर तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या अल्पेश यांचा पराभव झाला आहे. अल्पेश यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. राधनपुर येथील विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये अल्पेश यांचा साडेतीन हजारहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.
पटेल आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये अल्पेश हे ओबीसी नेता म्हणून पुढे आले होते. त्यानंतर २०१७ साली काँग्रेसने त्यांना राधनपुरच्या जागेवरुन विधानसभेचे तिकीट दिले होते. येथून निवडून आल्यानंतर अल्पेश यांचे काँग्रेसशी अनेक गोष्टींवरुन खटके उडू लागले. अखेर त्यांनी याच वर्षी १८ जुलै रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. अल्पेश यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राधनपुरच्या जागेवर पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रघुभाई देसाई यांनी अल्पेश यांचा पराभव केला. अल्पेश यांचे निकटवर्तीय आणि भाजपामध्ये प्रवेश केलेले आणखीन एक मोठे नाव म्हणजे धवलसिंह झाला यांचाही या पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. बायड येथील विधानसभेच्या जागेवरुन लढणाऱ्या झाला यांचा काँग्रेसच्या जशू पटेल यांनी पराभव केला.
अहमदाबादमधील अमराईवाडीबरोबर लूनावाडा आणि खेरालु येथील जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. अमराईवाडीमध्ये भाजपाच्या जगदीश पटेल यांनी काँग्रेसच्या धर्मेंद्र पटेल यांचा पराभाव केला. लूनावाडामध्ये भाजपाच्या जिगेश सेवक यांनी काँग्रेसच्या गुलाब सिंह यांना हरवले. तर खेरालुमध्ये काँग्रेसच्या बाबूजी ठाकोर यांचा पराभव झाला. खेरालुच्या जनतेने भाजपाच्या अजमलसिंह ठाकोर यांच्या पारड्यात मताधिक्य दिले. तर काँग्रेसने राधनपूर आणि बायडबरोबरच थराद येथील जागेवर तब्बल १५ वर्षांनंतर विजय मिळवला आहे.
महाराष्ट्रात भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या या नेत्यांचा झाला पराभव
लोकसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्येही भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पराभव झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून तर हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघातून पराभव झाला. तर गोंदियामध्येही काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा पराभव झाला आहे. वैभव पिचड, भरत गावित, रमेश आडसकर या नेत्यांनाही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2019 3:40 pm