आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वाखाली पटेल समाजाने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील महत्त्वाच्या सहा महापालिकांमध्ये भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले. अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सहाही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये पटेल आंदोलनांचा सत्ताधारी भाजपवर विशेष परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. मात्र, त्याचवेळी गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसने चांगली कामगिरी करीत अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर विजय मिळवला आहे.
भाजपने शहरांसोबतच गुजरातच्या ग्रामीण भागातही अनेक कामे केली आहेत. तरीही पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष के. जडेजा यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट, जामनगर, भावनगर या सहाही महापालिकांच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी सुरुवात झाली. सुरुवातीला भावनगर आणि सूरतमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत पाहायला मिळाली. पण नंतरच्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मागे टाकत यश संपादन केले. राजकोट, अहमदाबाद, बडोदा, जामनगर या चारही महापालिकांमध्ये सुरुवातीपासूनच भाजपने आघाडी घेतली होती.
जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगर पालिकांच्या निवडणुकीची मतमोजणीही बुधवारीच झाली. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकले असल्याचे चित्र आहे. बडोद्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. जामनगरमध्येही सहा पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवले आहे. अद्याप विविध ठिकाणी मतमोजणी सुरू असून त्याचे कल स्पष्ट होत आहेत.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यातच हार्दिक पटेल याने आरक्षणासाठी पटेल समाजाला एकत्रित करून आंदोलन पुकारल्यामुळे भाजपचे काय होणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यासाठीही ही निवडणूक लिटमस टेस्ट म्हणूनच बघितली गेली.