गुजरात महापालिका निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. सलग दोन दशकांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने महापालिका निवडणुकीत बाजी मारलीच, पण त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीला मिळालेला जनाधार हे सुद्धा या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्टय आहे.

२०१२-१३ साली भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीने सर्वात आधी दिल्ली सर केली. २०१५ आणि २०२० अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत आपने दिल्लीत विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजपाचा विस्तार होतोय, पण दिल्ली भाजपाला जिंकता आलेली नाही. दिल्ली जिंकण्यासाठी भाजपाने आपली सर्व ताकत पणाला लावली होती.

दिल्लीला लागून असलेल्या शेजारच्या पंजाबमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी मुख्य विरोधी पक्ष ठरला. आता सूरत महापालिका निवडणुकीतही आपने लक्षणीय यश मिळवले. इथे सुद्धा आपने काँग्रेसला धक्का दिला आहे.

आणखी वाचा- गुजरातमध्ये अंथरुणाला खिळलेल्या भाजपा उमेदवाराने जिंकून दाखवली निवडणूक

सूरतमध्ये आपचा उदय होण्याआधी….
आपने गुजरात महापालिका निवडणुकीत मिळवलेला विजय सूरत पर्यंत मर्यादीत आहे. भाजपाचे या राज्यावर वर्चस्व आहे, त्या दृष्टीने हा निकाल धोकादायक नाही. पण हा निकाल आपसाठी सकारात्मक संदेश असून, आप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार आहे. आम आदमी पार्टी शांतपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर स्वत:चा विस्तार करत आहे. सूरत महापालिका निवडणुकीत आपने २७ जागा जिंकल्या व मुख्य विरोधीपक्ष ठरला.

सूरत प्रमाणे आपने गोवा आणि जम्मू-काश्मीरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीत विजय मिळवला आहे. गोव्यात आपने पंचायत निवडणुकीत विजय मिळवला तर जम्मू-काश्मीरमध्ये आप सदस्याने डीडीसी निवडणुकीत विजयाची नोंद केली.

आपने पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आतिषी यांच्याकडे गुजरात महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्यासह प्रमुख नेत्यांनी प्रचारासह सूरतमध्ये रोड शो केला.
सूरतच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी ‘ही नव्या राजकारणाची सुरुवात’ असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा- “राजासारखे वागू नका, जमीनीशी नातं सांगणारं नेता व्हा”, मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला

काय आहे आपचा यूएसपी
आप अन्य राज्यांमध्ये विस्तार करताना दिल्ली मॉडेल जनतेसमोर प्रभावीपणे मांडत आहे. स्वस्त वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक हे मॉडेल आपचे नेते अन्य राज्यातील मतदारांसमोर मांडतात.

पक्ष विस्तार
आम आदमी पार्टीला राष्ट्रीय स्तरावर छाप उमटवायची आहे. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे. मनिष सिसोदीया आणि संजय सिंह हे पक्षाचे वरिष्ठ नेते वारंवार वरील राज्यांचे दौरे करत आहेत.