दिल्ली, बिहारमधील निवडणुकीत उडालेला धुव्वा आणि पाटीदार समाजाचे आंदोलन यामुळे धास्तावलेल्या भाजपने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तब्बल ५०० मुस्लिम उमेदवारांना यावेळी तिकीट दिले आहे. २०१० मध्ये मुस्लिम उमेदवारांना दिलेल्या उमेदवारीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यांनी जास्त असल्यामुळे अभ्यासकांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तब्बल ३०० मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि भाजपचे २५० मुस्लिम उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते. हाच अनुभव आणि दोन विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, गुजरातमधील पाटीदार समाजाचे आरक्षणांसाठीचे आंदोलन लक्षात घेऊन यावेळी ५०० मुस्लिम उमेदवारांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल थोड्या काळजीत आहेत. पटेल समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हार्दिक पटेल याच्या नेतृत्त्वाखाली गुजरातमध्ये विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चाला आणि सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. हार्दिक पटेल याने आरक्षणाची मागणी मान्य न केल्यास भाजपला निवडणुकीत धक्का देण्याचा इशाराही दिला होता. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला झटका बसू नये, म्हणूनच अधिकाधिक मुस्लिमांना यावेळी निवडणुकीत संधी देण्यात आली आहे.