गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी एक आठवडा स्वत:च विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. रुपाणी यांची मंगळवारी काँग्रेसच्या आमदाराने भेट घेतली होती त्या आमदारालाच करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने रुपानी यांनी वरील निर्णय घेतला आहे.

रुपाणी यांची प्रकृती उत्तम आहे, ते व्हिडीओ कॉन्फरन्स, व्हिडीओ-कॉलिंग आणि टेली-कॉलिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासकीय कारभार पाहणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे सचिव अश्विनीकुमार यांनी बुधवारी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकाही अभ्यागताला जाण्याची मंजुरी एक आठवडा दिली जाणार नाही. प्रख्यात डॉक्टर आर. के. पटेल आणि अतुल पटेल यांनी रुपाणी यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे, असे सचिवांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांनी पक्षाच्या काही आमदारांसह रुपाणी यांची मंगळवारी सकाळी भेट घेतली होती आणि खेडावाला यांना करोनाची लागण झाल्याचे सायंकाळी स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर खेडावाला यांनी पत्रकारांशीही चर्चा केली होती.

अहमदाबादमधील काँग्रेसच्या नगरसेवकाला करोनाची लागण

काँग्रेस पक्षाचे नगरसेवर बद्रुद्दीन शेख यांना करोनाची लागण झाली असल्याचे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. शेख हे शहरातील बेहरामपुरा विभागातील नगरसेवक असून त्यांनी करोना चाचणीसाठी दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. शेख यांना करोनाची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाल्यानंतर त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते, मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे अहमदाबाद पालिका आयुक्त विजय नेहरा यांनी सांगितले.