पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ उद्योजकांचे सुमारे १ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. पण आम्ही गुजरातमध्ये सत्तेत आलो तर १० दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु असे आश्वासन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. तसेच ज्यांना कर्जाची गरज आहे अशा लोकांना सहज कर्ज उपलब्ध करुन देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातमधील राजकोट या भागाचा दौरा केला. राजकोटमधील सभेत राहुल गांधी म्हणाले, मोदींनी १५ उद्योजकांचे १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. कंपन्यांनी याचा लाभ सर्वसामान्यांना दिला का, तरुणांना रोजगार मिळाला नाही असा दावा त्यांनी केला. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १० दिवसात कर्जमाफ करु असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
चीनला टक्कर देण्यासाठी काँग्रेस तीन गोष्टींवर भर देणार आहे. आम्ही रागाने नव्हे तर छोट्या उद्योजकांना मदत करुन आणि तरुणांना रोजगार देऊन चीनवर मात करु असे त्यांनी सांगितले. शिक्षा आणि रोजगार हा प्रत्येक तरुणाचा अधिकार असून पाटीदार समाजाचा संघर्ष व्यर्थ ठरु देणार नाही. राज्यात काँग्रेस सरकार आल्यावर सर्वांना न्याय मिळवून देणार असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनीदेखील बुधवारी मोदी सरकारवर टीका केली. मी देशभरात फिरतो. आता लोक म्हणत आहेत, अच्छे दिन तर आले नाहीत. आता हे वाईट दिवस कधी जातील असे त्यांनी म्हटले आहे. देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात अर्थतज्ज्ञांनी आता न घाबरता बोलले आणि लिहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.