गुजरातमधील ओबीसी नेते आणि राधनपूर येथील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ते एका सांगितिक कार्यक्रमात नोटा उधळताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवरुन सर्वत्र टीका हेत असली तरी आपल्या कृत्याचे त्यांनी समर्थन केले आहे. चांगल्या कामासाठी पैसे उधळल्यास कुठे बिघडले? असे त्यांनी म्हटले आहे.


राधनपूर शहराच्या भाभर रस्त्यावरील सदाराम कुमार छात्रालय येथे शनिवारी रात्री या लोकसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राधनपूर येथील मुलींच्या वसतिगृहाच्या निर्मितीसाठी निधी गोळा करण्यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनीही हजेरी लावली होती. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, चलनी नोटांचा वापर गळ्यात घालण्यासाठीच्या माळा बनवण्यासाठी करु नये, सजावटीसाठी तसेच कुठल्याही कार्यक्रमात उडवण्यासाठी करु नये. याबाबत ठाकूर यांनी विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, अशा प्रकारामुळे वाद निर्माण होऊ शकतो हे मला माहिती होते. मात्र, मुलींच्या शिक्षणाच्या कामासाठी निधी गोळा करण्याच्या चांगल्या कामासाठी हे कृत्य आपण केले.

ठाकूर म्हणाले, आपल्या लोकप्रियतेसाठी यापूर्वी लोक पैसे उडवायचे मात्र, मी हे मुलींच्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी केले. माझ्या या कृतीमुळे वाद निर्माण होऊ शकते हे मला आधीच माहिती होते. मात्र, चांगल्या कामासाठी मी पैसे उडवले, असे ते म्हणाले. मी केवळ १० रुपयांच्याय नोटा उडवल्या. या कार्यक्रमाला १५ आमदार उपस्थित होते. तर चावडा यांचे म्हणणे आहे की, ठाकूर यांनी पैसे उधळण्यापूर्वीच आपण तेथून निघून गेलो होतो. मात्र, कार्यक्रम चांगल्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.