गुजरातमध्ये काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार बसला. त्यानंतर आता गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर असतानाच गुजरातचे प्रदेशाध्यक्ष व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे.

गुजरामध्ये अहमदाबाद महापालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणूनंतर काँग्रेसची राज्यातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला मानहानीकारक हार पत्करावी लागली. त्याचबरोबर अलिकडे झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला.

पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसचे गुजरात प्रभारी राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे पराभवाची कारणमीमांसा करणारा एक अहवाल पाठवला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये ही पडझड होताना दिसत आहे. अमित चावडा यांनी गुजरातचे प्रभारी राजेश यादव यांना बुधवारी आपला राजीनामा दिला.

गुजरातमध्ये काँग्रेसची कामगिरी सातत्यानं निराशाजनक होत असून, पक्षातूनच प्रश्न उपस्थित केले जात आहे. सातत्यानं पक्षावर टीका होत असल्यामुळेच अमित चावडा यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधासभाध्यक्ष परेश धनानी यांच्याकडे सोपवला. चावडा यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानं आता दोन व्यक्तींची नावं चर्चेत आहे. यात शैलेश परमार पूजा वंश आणि अश्विन कोटवाल यांची नावं स्पर्धेत आहेत.