X
Advertisement

करोनामुळे एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर १५ लाखांची FD मोडून ‘ते’ करोना रुग्णांना करतायत मदत

त्यांनी आपली कारही रुग्णवाहिकेसारखी वापरण्यासाठी दिलीय

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातून अनेक नकारात्मक आणि धक्कादायक बातम्या समोर येत असतानाच या संकटकाळामध्ये प्रेरणा देणाऱ्या आणि करोनाच्या लढाईमध्ये सामान्या लोकांकडून केल्या जाणाऱ्या काही असामान्य मदतीच्या बातम्याही समोर येत आहेत. अशीच एक बातमी गुजरातमधून समोर आली आहे. येथील एका वयस्कर दांपत्याने करोना कालावधीमध्ये करोना रुग्णांना मदत करण्यासाठी आपल्या बँकेच्या ठेवींमधील १५ लाख रुपयांची एफडी मोडली आहे. मागील वर्षी करोनामुळे एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर या दांपत्याने इतर करोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतलाय.

गुजरातमधील रसिक मेहता आणि कल्पना मेहता यांनी मागील वर्षी करोनामुळे आपला एकुलता एक मुलगा गमावला. त्यानंतर मेहता दांपत्याने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी जमा केलेला पैसा करोना रुग्णांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. १५ लाखांची एफडी त्यांनी कालावधी पूर्ण होण्याआधीच मोडली. करोनाचा संसर्ग झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या आणि मदत हव्या असणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी हे १५ लाख वापरले आहेत. “रसिक मेहता आणि कल्पना मेहता यांनी आपली १५ लाखांची एफडी मोडली. करोनामुळे त्यांचा मुलगा मागील वर्षी मरण पावला. त्याच्या भविष्यासाठी त्यांनी हा पैसा साठवला होता. आता तो पैसा ते करोना रुग्णांसाठी वापरत आहेत,” असं नौशीन खान या महिलेने ट्विटरवर या दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं आहे. हे लोकं खरे हिरो आहेत असंही नौशीनने म्हटलं आहे.

आपल्या आयुष्यभराची कमाई करोना कालावधी वापरण्याचा मेहता दांपत्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांनी क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या २०० रुग्णांना आवश्यक गोष्टींचा समावेश असणारे किट्स वाटले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी ३५० जणांच्या लसीकरणाचीही सोय करुन दिलीय. इतकच नाही तर करोना रुग्णांची ने आण करण्यासाठी त्यांनी आपली कारही रुग्णवाहिकेप्रमाणे वापरण्यासाठी दिली आहे.

मेहता दांपत्यावर कौतुकाचा वर्षाव होतानाचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

१) अशा लोकांचा सन्मान केला पाहिजे

२) शब्दच नाहीत

३) त्यांच्या मुलाला अभिमान वाटेल

४) देवच

५) देशाला अभिमान आहे

अनेकांनी या दोघांचे काम प्रेरणादायक असल्याचं सांगत अशा लोकांमुळे माणुसकीला अर्थ असल्याचं म्हटलं आहे.

20
READ IN APP
X