दलित कार्यकर्ते भानुभाई वनकर यांनी आत्मदहन केल्यानंतर गुजरातमध्ये रविवारी आंदोलन भडकले आहे. राजधानी गांधीनगर, अहमदाबाद व मेहसाणा जिल्ह्य़ातील पाटण येथे आंदोलकांनी रास्ता रोको केले. अहमदाबादमधील सारसपूर येथे अपक्ष आमदार व दलित नेते जिग्नेश मेवानी व इतर सत्तर जणांना सकाळी ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

ताब्यात घेतल्या मेवानींचे पोलिसांशी वर्तन चांगले नव्हते असा दावा पोलिसांनी केला आहे. तर पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा दावा मेवानी यांनी केला आहे. तर पोलिसांनीच वाहनाबाहेर ओढले अशी ट्विप्पणी मेवानी यांनी केली आहे. पाटण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ फेब्रुवारीला भानुभाई वनकर (वय ६२) यांनी पेटवून घेतले होते. दलितांना जमीन द्यावी अशी त्यांची मागणी होती. १६ फेब्रुवारीला अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते.

जिग्नेश मेवानी यांनी रविवारी सकाळी सारंगपूर येथे दलितांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मेवानी यांनी शहरात शांतता राखण्यासाठी सहकार्य केले नाही, असा आरोप सहपोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) जे.के.भट्ट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दुर्दैवाने आम्हाला प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी अहमदाबाद शहरातील सारंगपूर व वडज परिसरातून जवळपास ७० जणांना ताब्यात घेतले होते. शहरात जलद कृती दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

सरकारकडून मागण्या मान्य

वनकर कुटुंबीयांच्या दलितांना जमीन देण्यासह इतर मागण्या शनिवारी मान्य केल्या आहेत. याबाबत सरकारने परिपत्रक काढावे अशी मेवानी यांची मागणी आहे. वनकर यांच्या मृत्यू चौकशीबाबत न्यायिक आयोग स्थापन करण्याची घोषणाही शनिवारी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली होती. तसेच त्यांच्या कुटुंबीयांतील एकाला सरकारी नोकरी देण्याचे पटेल यांनी जाहीर केले.