पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओतील अधिकाऱ्यांच्या नावे बनावट ई-मेल पत्ते तयार करुन त्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी शुक्रवारी गुजरातमधील एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या डॉक्टरने स्वतःच्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी या ई-मेल्सचा वापर केला होता. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. विजय पारीख (एमडी) असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव असून अहमदाबाद सायबर क्राईमच्या शाखेनं अमरेली येथील घरातून त्याला अटक केली आहे. गुजरातमधील काही सरकारी अधिकाऱ्यांना तसेच आयपीएस अधिकाऱ्यांना नुकतेच काही ई-मेल मिळाले होते. हे ई-मेल पीएमओतील अधिकाऱ्यांनी पाठवल्याचं दिसतं होतं. यामध्ये डॉ. पारीखच्या तक्रारीवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते.

डॉ. पारीख याने अहमदाबादमधील परिमल गार्डन परिसरात निशित शाह याच्याकडून दोन कार्यालये विकत घेतली होती. मात्र, शाहने डॉ. पाऱीख यांची फसवणूक करत त्यांना कार्यालयांचा ताबाच दिला नाही. त्यानंतर पारीख याने न्यायासाठी पीएमओ कार्यालयाकडे धाव घेतली. त्यानंतर पीएमओच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांना डॉ. पारीख याच्या तक्रार अर्जावर तात्काळ कार्यवाही करा, असे आदेश देताना त्याला कार्यालयांचा ताबा परत मिळवून देण्यासाठी मदत करा, असं या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. तसेच या कार्यवाहीवर पीएमओची नजर असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सायबर क्राईमने या प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की, डॉ. पारीख याने स्वतःचं हे ई-मेलचे पत्ते तयार केले आणि त्याद्वारे आपल्या मिळकतीचा ताबा मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करताना पीएमओतील अधिकाऱ्यांच्या नावे बनावट ई-मेल पत्ते तयार केल्याच्या या गुन्हेगारी कृत्यानंतर डॉ. पारीख याला पोलिसांनी अटक केली. तसेच याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.