महात्मा गांधी यांनी ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले ती शाळा आता बंद होणार आहे. गुजरात सरकारने ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेचा निकाल घसरत असल्याने ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आता या शाळेचे रुपांतर संग्रहालयामध्ये केले जाणार आहे.

महात्मा गांधी यांनी गुजरातच्या राजकोटमधील अल्फ्रेड हायस्कूलमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले होते. जूनागडच्या तत्कालीन नवाबांनी १८७५ मध्ये ही शाळा सुरु केली होती. या शाळेत महात्मा गांधींनी १८८० ते १८८७ या कालावधीत माध्यमिक शिक्षण घेतले होते. १९७१ मध्ये या शाळेचे नामकरण मोहनदास गांधी विद्यालय असे करण्यात आले होते. या शाळेत मुलींना मोफत शिक्षण दिले जायचे. तर मुलांकडून फक्त पाच रुपये एवढे शुल्क घेतले जायचे.

गेल्या काही वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे गुजरातच्या शिक्षण विभागाने ही शाळा बंद करुन तिथे जागतिक दर्जाचे संग्रहालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राज्य सरकारने शाळेऐवजी संग्रहालय सुरु करण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. या शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील दुसऱ्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

‘राज्य सरकारच्या निर्णयानुसार आम्ही २९ एप्रिलपासून शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला द्यायला सुरुवात केली आहे’ अशी माहिती राजकोटच्या शिक्षण अधिकारी रेवा पटेल यांनी दिली. आम्ही शाळेचा निकाल सुधारावा आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले. पण यात अपयश आल्याचे पटेल यांनी सांगितले. गेल्या वर्षीच आम्ही शाळेतील १५० विद्यार्थ्यांना परिसरातील दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला होता असे त्यांनी नमूद केले.

महात्मा गांधींनी शिक्षण घेतलेली शाळा बंद होणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गुजरातमधील भाजप सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन भाजप निशाणा साधला आहे. घसरलेला निकाल आणि विद्यार्थ्यांची कमी झालेली संख्या यामुळे महात्मा गांधींनी शिक्षण घेतलेली शाळा बंद होत आहे. गुजरात मॉडेल किती प्रसिद्ध आहे ? असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.