गुजरातमध्ये भाजप इव्हीएम हॅक करणार असल्याचा आरोप केल्यानंतर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. गुजरातमधील ५ हजार इव्हीएम मशिन हॅक करण्याचा कट असून यासाठी अहमदाबादमधील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. या कामात सुमारे १४० अभियंते जुंपले आहेत, असा दावा त्यांनी केला.

गुजरात विधानसभा निवडणुकांचा सोमवारी निकाल लागणार असून या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. शनिवारी आणि रविवारी भाजप इव्हीएममध्ये घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हार्दिक पटेल यांनी शनिवारी रात्री उशीरा पुन्हा एकदा ट्विटरवरुन भाजपवर आरोप केले. ‘अहमदाबादमधील एका कंपनीच्या मार्फत १४० अभियंत्यांच्या मदतीने ५ हजार इव्हीएमचे सोर्स कोड हॅक करण्याची तयारी आहे’ असे ट्विट त्यांनी केले आहे. विसनगर, पाटण, राधनपूर, टँकारा, जेतपूर, राजकोट, लाठी – बाबरा, छोटा उदयपूर, संतरामपूर, सांवली, मांगरोल, नादोद, राजपीपला, डभोई या भागात इव्हीएम हॅक करण्यात आले. पाटीदार आणि आदिवासी मतदार असलेल्या भागांनाच लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला.

शनिवारी दुपारी देखील हार्दिक पटेल यांनी इव्हीएम घोटाळ्याची शंका उपस्थित केली होती. इव्हीएममध्ये घोळ करुन भाजप गुजरातमधील निवडणूक जिंकणार आणि हिमाचल प्रदेशमध्ये पराभूत होणार. यामुळे कोणाला भाजपवर शंका येणार नाही, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. इव्हीएममध्ये फेरफार केली नाही तर भाजपला निवडणुकीत फक्त ८२ जागांवरच विजय मिळेल, असा दावा देखील त्यांनी केला होता.
पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर हार्दिक पटेल यांना ओळख मिळाली. गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून यामुळे पाटीदार समाजाची मते भाजपला मिळणार की काँग्रेसला याची उत्सुकता निर्माण झाली आहे.