गुजरातमध्ये हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर यांच्यासारखे युवा नेते काँग्रेसला पाठिंबा देत असतानाच दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष भाजपच्या मदतीला धावून आल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये आप आणि भाजपची छुपी युती असल्याची चर्चा असून काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपकडून ‘आप’चा वापर होत असल्याचे वृत्त आहे.

‘अहमदाबाद मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘आप’ने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपची स्थिती बिकट असलेल्या मतदारसंघांमधूनच हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. आप रिंगणात उतरल्याने या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या मतांचे विभाजन होईल आणि शेवटी याचा फायदा भाजपला होईल, असे सांगितले जाते.

आप रिंगणात असलेल्या ११ पैकी पाच जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पाच हजार पेक्षा कमी मतांनी विजय झाला होता. यात भर म्हणजे या ११ मतदारसंघांमध्ये पटेल आणि ओबीसी मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. हे दोन्ही समाज गुजरातमध्ये भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे याचा फटका भाजपला बसण्याची चिन्हे होती. मात्र आपच्या उमेदवारांना रिंगणात उतरवून काँग्रेच्या मतांचे विभाजन करण्याची खेळी भाजपने खेळली आहे.

‘आप’च्या गुजरातमधील नेत्यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. आपचे प्रवक्ते हर्षिल नायक म्हणाले, हा दावा निराधार आहे. पंजाब निवडणुकीनंतर पक्षाने ठराविक मतदार संघांमधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात पक्षाची पाळेमुळे रुजली आहेत आणि पक्षाकडे सक्षम नेता आहे, त्याच मतदारसंघातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असे नायक यांनी सांगितले. सध्या आम्ही ११ उमेदवारांचीच यादी जाहीर केली आहे. आणखी ५० जागांचा आम्ही आढावा घेत आहोत, असे ते म्हणाले. ‘आम्ही भाजपला मदत करत आहोत असा काँग्रेसचा आरोप आहे. मग आम्ही निवडणूक लढवली नाही तर विजय निश्चित असल्याची खात्री काँग्रेस देऊ शकतो का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. २०२० मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही उमेदवार उतरवणार नाही का, असा सवाल त्यांनी काँग्रेस नेत्यांना विचारला.