एटीएम हॅक होऊ शकतात तर इव्हीएम का नाही, असा प्रश्न विचारतानाच इव्हीएमविरोधात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोहीम सुरु करावी, असे आवाहन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केले. पैशाच्या बळावर आणि इव्हीएमच्या जोरावर भाजपचा विजय झाल्याचा आरोप त्यांनी केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवत सत्ता कायम राखली. या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपला इव्हीएममुळेच विजय मिळाला असा आरोप त्यांनी केला. हार्दिक पटेल म्हणाले, आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर माझी लढाई सुरु असेल. आगामी काळात लवकरच पुन्हा आंदोलनाला सुरुवात करणार. इव्हीएमवर शंका उपस्थित करु नये यासाठी गुजरातमध्ये ‘काँटे की टक्कर’ दाखवण्यात आली, असे ते म्हणालेत.

पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या भागात भाजपविरोधात मतदान झाले. मी आंदोलनकारी असून माझे काम भाजपविरोधात आंदोलन करणे एवढेच होते, असे त्यांनी स्पष्ट केले. इव्हीएमचा वापर आपण लवकर मतमोजणी व्हावी यासाठी करतो. पण हिमाचलमध्ये सुमारे एक महिना तर गुजरातमध्ये ८ ते १० दिवस इव्हीएम एका खोलीत होत्या, त्यामुळे शंका येते, असे त्यांनी म्हटले आहे.

ठाकूर आणि पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या भागांमध्येच इव्हीएममध्ये फेरफार झाले. त्यामुळे गुजरातमध्ये जनतेने आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले. काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी नमूद केले.

निवडणुकीच्या निकालात फटका बसल्याचे वाटते का असा प्रश्न विचारला असता हार्दिक म्हणाले, मी अजून २३ वर्षांचा असून राजकारणातील वाटचालीवर भविष्यात बोलू शकतो. मला जे मिळवायचे होते ते मी मिळवले आणि जे गमवायचे होते ते मी गमावले. मी लढत राहणार, मी घाबरुन घरी बसणार नाही. आता मी गावासोबत शहराकडे लक्ष देईन, असे त्यांनी सांगितले. मी भाजपला शुभेच्छा देणार नाही. कारण ते बेईमानीने निवडणूक जिंकले. जर इव्हीएममध्ये फेरफार केली नसती तर भाजपचा पराभव अटळ होता, असेही ते म्हणालेत.