गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज (गुरुवार) सांगता झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात एकूण ६८.७० टक्के मतदान झाले.  त्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी या निवडणूकीच्या (पहिला आणि दुसरा टप्पा) मतदानोत्तर चाचण्यांमधील आकडेवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे. या आकडेवारीच्या एकत्रित विश्लेषणातून गुजरातमध्ये पुन्हा भाजप सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथील एकूण १८२ जागांपैकी बहुमतासाठी ९२ जागा मिळवणे कोणत्याही पक्षासाठी गरजेचे आहे.

इंडिया टुडेच्या चाचणीनुसार, ९९ ते ११३ जागांवर भाजपचा तर ६८ ते ८२ जागांवर काँग्रेसचा विजय होण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या चाचणीनुसार, १४२ जागांपैकी भाजप ९३ तर ४८ जागांवर काँग्रेस विजयी ठरण्याची शक्यता आहे. इंडिया टिव्हीने पहिल्या १२९ जागांपैकी ७८ जागांवर भाजप तर काँग्रेसला ४९ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. इंडिया टिव्ही आणि व्हीएमआरच्या चाचणीनुसार, पहिल्या ८९ जागांवर ५५ जागांवर भाजप तर ३३ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर इतर पक्षाचा उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे.

एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या चाचणीनुसार, आतापर्यंत समोर आलेल्या ८९ जागांपैकी भाजप ५८ जागांवर जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस ४० जागांवर जिंकू शकते. दक्षिण गुजरातमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. दक्षिण गुजरातमधील ३५ जागांपैकी भाजप २४ जागांवर तर काँग्रेसला ११ जागांवर विजय मिळू शकतो. दक्षिण गुजरातमध्ये भाजपला ५० टक्के तर काँग्रेसला ४० टक्के मतं मिळू शकतात.

एबीपी आणि सीएसडीएसच्या चाचण्यांनुसार, सौराष्ट्र आणि कच्छ भागात भाजपला चांगली आघाडी मिळू शकते. भाजपला ४९ टक्के मतांचा वाटा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस ४१ टक्के तर इतरांना १० टक्के मतं मिळू शकतात. या आकड्यांना जर जागांमध्ये बदलले तर भाजपला या भागात ५४ पैकी ३४ जागा मिळतील तर काँग्रेसला १९ आणि इतरांना १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप येथे सरकार स्थापण्यात यशस्वी होऊ शकते.