संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या जनमत चाचणीचे (ओपिनियन पोल) निकाल गुरूवारी समोर आले. यामध्ये गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. लोकनीति आणि सीएसडीएस यांच्या सर्वेक्षणानुसार विधानसभेच्या १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये भाजपला ११३ ते १२१ मतदारसंघांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत ५८ ते ६४ जागांवर विजय मिळेल. याशिवाय, १ ते ७ मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

पालिकेतील वरिष्ठ अधिकारी गुजरात निवडणुकीच्या कामात

या निवडणुकीत भाजपला एकूण ४७ तर काँग्रेसला ४१ टक्के मते पडतील. २०१२ साली झालेल्या निवडणुकीत भाजपला ४८ टक्के तर काँग्रेसला ३९ टक्के मते मिळाली होती. तर २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ६० टक्के आणि काँग्रेसला ३३ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला होता. यावेळी गुजरातमध्ये सत्तापालट होईल, असा दावा विरोधक करत होते. मात्र, या निवडणुकीत भाजप सत्ता कायम राखणार असल्याचे जनमत चाचणीत दिसत आहे. परंतु, निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. विशेष गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत १५ टक्क्यांनी घसरण झाल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.

‘राज्य’कारण हिमाचल प्रदेश : हिमाचलचे सफरचंद भाजपच्या परडीत?

जनमत चाचणीतील काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे पुढीलप्रमाणे:

१. दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये भाजपला आघाडी; सौराष्ट्र-कच्छ आणि उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसची सरशी
२. आदिवासी बहुल दक्षिण गुजरातमधील ३५ जागांवर भाजपला ५१ टक्के तर काँग्रेसला ३३ टक्के मते मिळण्याची शक्यता. यापूर्वी १ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीत भाजपला या ठिकाणी ५४ टक्के तर भाजपला २७ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
३. जनमत चाचणीनुसार राज्यातील ५० टक्के महिलांचा भाजपला तर ३९ टक्के महिलांचा काँग्रेसला पाठिंबा
४. मध्य गुजरातमधील ४० जागांवर भाजपला ५४ टक्के तर काँग्रेसला ३८ टक्के मते मिळण्याची शक्यता. १ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीच्या तुलनेत भाजपला २ टक्क्यांचे नुकसान तर काँग्रेसच्या मतांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता.
४. उत्तर गुजरातमधील ५३ मतदारसंघांमध्ये भाजपला ४४ टक्के तर काँग्रेसला ४९ टक्के मते मिळण्याची शक्यता. १ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीच्या निकालांच्या तुलनेत भाजपच्या मतांमध्ये १५ टक्क्यांची घट तर काँग्रेसच्या मतामध्ये १६ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता.
५. सौराष्ट्र-कच्छमधील ५४ जागांवर भाजपला ४४ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळण्याची शक्यता. १ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनमत चाचणीच्या निकालात भाजपला या ठिकाणी ६५ तर काँग्रेसला २६ टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.