News Flash

निवडणूक आयोग हे भाजपचे कळसूत्री बाहुले ; मोदींच्या रोड शोवर काँग्रेसचा घणाघात

आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप

साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर मिनी रोड शो करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरुन काँग्रेसने निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर मिनी रोड शो करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले असल्याची टीका काँग्रेसने केली. निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदानात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. साबरमतीतील मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर नरेंद्र मोदींनी मिनी रोड शोच केला. मोदींनी कारच्या फुटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन केले. सुमारे ३०० मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ते पुढे गेले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाले. भाजपचे झेंडेही या दरम्यान दिसत होते.

मोदींच्या रोड शोवरुन काँग्रेसने दुपारी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोलच केला. गुजरातमध्ये पंतप्रधानच मतदान केल्यावर रोड शो करणार असतील तर यातून दुसऱ्या लोकांना काय प्रेरणा मिळणार?, सर्रास नियम पायदळी तुडवले जात आहेत आणि हा प्रकार देशातील जनतेच्या डोळ्यांदेखत सुरु आहे, असे अशोक गहलोत यांनी सांगितले. मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून या प्रकरणात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करु, असे त्यांनी नमूद केले. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने भाजप आणि नरेंद्र मोदींना जनतेने नाकारले आहे, ते पाहून भाजपने पराभव स्वीकारल्याचे दिसते, असा टोला रणदीप सुरजेवाला यांनी लगावला. निवडणूक आयोग हे भाजपचे कळसूत्री बाहुले झाले असून भाजपने आयोगाला ओलीसच ठेवले. भाजपाध्यक्षांच्या विमानतळावरील पत्रकार परिषदेवरही आयोगाने मौन बाळगले, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने देशाच्या संविधानाकडेच दुर्लक्ष केले, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधींच्या मुलाखतींवर निवडणूक आयोग अर्धा तासात कारवाई करते, मात्र मोदींच्या रोड शोवर कारवाई नाही. यावरुनच निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका दिसते आणि आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोग आंधळे झाले असून त्यांना मोदींचा रोड शो दिसत नाही. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही, आयोगाने जागे व्हावे, असे काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटले. मुख्य निवडणूक आयुक्त हे मोदींचे खासगी सचिव असल्यासारखे वागत आहेत, असा गंभीर आरोपच त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 2:30 pm

Web Title: gujarat election 2017 pm narendra modi road show casting vote case of violation model code of conduct alleges congress
Next Stories
1 जिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा
2 ‘वन मॅन शो, टू मॅन आर्मीने’ आता दिल्लीला परत यावं; शत्रुघ्न सिन्हांचा टोला
3 आयएनएस ‘कलवरी’ नौदलात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
Just Now!
X