अमित शहांनी फोडले खापर, २०१९च्या लोकसभेतील विजय निश्चित

काँग्रेसने खालच्या दर्जाच्या पातळीचा प्रचार केल्याने गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचा दावा पक्षाध्यक्ष अमित शहांनी सोमवारी केला. मात्र, त्याचवेळी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निकालाने घराणेशाही व ध्रुवीकरणावर विकासाने मात केल्याने २०१९च्या लोकसभेमधील भाजपचा विजय निश्चित झाल्याचेही त्यांनी जाहीर केले.

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वत: शहांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सलग सहाव्यांदा सत्ता मिळविण्याचा विक्रम भाजपने केला असला तरी काँग्रेसने अक्षरश: दमछाक केली. तरीसुद्धा कर्मभूमीत पराभवाचे तोंड पाहावे न लागल्याचा अवर्णनीय आनंद शहांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

१८२ पैकी दीडशे जागा जिंकण्याचे उद्दिष्ट शहांनी डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र, तीन आकडी संख्या गाठतानाच पक्षाच्या नाकीनऊ  आले. त्याचा संदर्भ देऊन विचारलेल्या प्रश्नावर शहा म्हणाले, ‘विरोधकांनी प्रचाराची हीन पातळी गाठली. ध्रुवीकरण केले, भ्रम पसरविला. त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या. पण २०१२च्या तुलनेत मतांची टक्केवारी मात्र वाढली. १९९०पासून भाजपने लोकसभा अथवा विधानसभेची एकही निवडणूक गमाविलेली नाही. ही जबरदस्त कामगिरी आहे.’

भाजपने केलेल्या विकासाला मिळालेली ही पावती असल्याचे सांगितले.

प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात येईल

यापुढे देशामध्ये कामगिरीवर आधारित राजकारणाचे युग सुरू झाल्याचा त्यांनी दावा केला. ते म्हणाले, ‘गुजरातच्या विकासाबाबत वावडय़ा उडविणाऱ्यांना गुजराती जनतेने

चोख प्रत्युत्तर दिले. या विजयाने २०१९च्या लोकसभा निवडणुकीमधील मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. २०२२पर्यंत युवकांसाठी मोदींनी ठरविलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात येईल.’