News Flash

काँग्रेसने निवडणुकीत जातीयवादाची बीजे रोवली!

लोकांनी भूतकाळ विसरून एकमेकांशी सख्य जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

| December 19, 2017 03:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी ‘भुकेल्या’ असलेल्या काँग्रेसने या ठिकाणी जातीयवादाची बीजे रोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. गुजरातमध्ये भाजपला विजयी करणाऱ्या मतदारांनी आपल्या सरकारच्या सुधारणांवर शिक्कामोर्तब केले आहे, असे ते म्हणाले.

भाजपने गुजरात आणि हिमाचल प्रदेशात मिळवलेला विजय स्वीकारणे काँग्रेस आणि आपले टीकाकार यांना कठीण जात असल्याचे सांगून, येथील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी यांनी या दोघांवरही जोरदार टीका केली.

विकासाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करताना मोदी यांनी निवडणुकीपूर्वी अनेक जातींची आंदोलने अनुभवणाऱ्या गुजरातमध्ये सामाजिक ऐक्याच्या आवश्यकतेवर भर दिला. लोकांनी भूतकाळ विसरून एकमेकांशी सख्य जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

२०१४ साली भाजप सत्तेवर आल्यानंतर विकासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सहकार्यात्मक संघराज्यवाद बळकट करण्यासाठी आपले ‘निर्णायक’ सरकार अथक काम करत असल्यामुळे कुणीही विकासाच्या वाटचालीला गालबोट लावू नये असेही मोदी म्हणाले.

यावेळी गुजरातमधील विजय ‘सामान्य’ नव्हे तर ‘असामान्य’ होता, असे सांगून मोदी म्हणाले की, राज्य सरकारवर सर्व बाजूंनी हल्ले करण्यात येत होते आणि चुकीच्या माहितीचा तर जणू महापूर आला होता.

विरोधकाच्या भूमिकेत काँग्रेस दृश्य स्वरूपात दिसत होता, पण त्याच्या सोबतीने अनेक शक्ती काम करत होत्या. ‘एकदा तरी भाजपला सत्तेवरून खाली खेचा’, या उद्देशासाठी सर्व प्रकारची कारस्थाने रचण्यात आली, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.

विकासाच्या मुद्दय़ावर काही जणांचा राग असू शकतो, पण काही जण तर त्याची थट्टा उडवत होते, असे त्यांनी नाव न घेता काँग्रेस आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्या संदर्भात सांगितले. ‘विकास वेडा झाला आहे’, अशी प्रचारमोहीम या दोघांनी राबवली होती.

३० वर्षांपूर्वीपर्यंत (काँग्रेसच्या सत्ताकाळात) राज्यात ‘जातीयवादाचे विष’ मोठय़ा प्रमाणात पसरले होते, मात्र भाजप सरकार आणि कार्यकर्त्यांनी ते हटवण्यासाठी काम केले. सत्तेच्या भुकेसाठी गेल्या काही महिन्यात काही जणांनी निवडणुकीच्या काळात जातीयवादाची बीजे रोवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्यांना नाकारले आहे, असेही मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 3:14 am

Web Title: gujarat election result 2017 casteism issue narendra modi congress rahul gandhi
Next Stories
1 काँग्रेसच्या खालच्या पातळीच्या प्रचारामुळे भाजपला कमी जागा
2 जनमत चाचण्यांना चकवा
3 अस्वच्छता निर्मूलनाबाबत राज्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव
Just Now!
X