News Flash

दुसऱ्या टप्प्याने भाजपला तारले!

पहिल्या टप्प्यातील मतदानाचा अंदाज आल्यावरच भाजपचे नेते अधिक सावध झाले असावेत.

आक्रमक प्रचाराची खेळी यशस्वी; पाकिस्तानच्या उल्लेखाचा भाजपला फायदा?

गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात पहिल्या टप्प्यात काँग्रेसने आघाडी घेतल्याचे लक्षात येताच भाजप नेते सावध झाले. गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे, असे विधान करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतांच्या ध्रुवीकरणावर भर दिला. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे भाजपला तारल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबरला सौराष्ट्र, कच्छ आणि महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण गुजरातमधील ८९ मतदारसंघांत मतदान झाले होते. सौराष्ट्र आणि कच्छमधील ५४ पैकी ३० जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. भाजपचे २३ उमेदवार निवडून आले. २०१२ मध्ये भाजपला ३५ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या. पटेलबहुल सौराष्ट्रात काँग्रेसच्या १४ जागा वाढल्या असताना भाजपच्या जागा १२ने घटल्या आहेत. वलसाड, सुरतचा समावेश असलेल्या दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा होती. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यावर सुरतमध्ये व्यापाऱ्यांचे मोठे आंदोलन झाले होते. दक्षिण गुजरातमधील ३५ पैकी २५ जागा भाजपला तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील ८९ पैकी भाजपला ४८ तर काँग्रेसला ४० जागा मिळाल्या. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा अंदाज आल्यावरच भाजपचे नेते अधिक सावध झाले असावेत.

सौराष्ट्रातील शेतकरी वर्गात मोठय़ा प्रमाणावर असंतोष आहे. पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज होते. त्याचा फटका भाजपला बसला आहे. शेतकरी वर्गाच्या नाराजीमुळेच काँग्रेसला यश मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. सौराष्ट्रात भाजपच्या विरोधात नाराजी उघडपणे दिसत होती. त्याचा मोठय़ा प्रमाणावर फायदा झाल्याचे काँग्रेसचे सौराष्ट्राचे समन्वयक राजीव सातव यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर मोदी यांनी अखेरच्या टप्प्यातील प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा पुढे आणला. पाकिस्तानचा हस्तक्षेप, मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली बैठक व त्याला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर यांची उपस्थिती, काँग्रेस नेते अहमद पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत अशी पाकिस्तानी लष्कराच्या एका माजी अधिकाऱ्याने व्यक्त केलेली भावना हे सारे मुद्दे मोदी यांनी आपल्या भाषणात मांडले. मतांच्या ध्रुवीकरणाकरिता मोदी यांनी पाकिस्तानचा पुरेपूर वापर करून घेतला.

दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान झाले. त्यात भाजपला ५१ जागा मिळाल्या. हार्दिक पटेल यांच्या आंदोलनाचा जोर असलेल्या उत्तर गुजरातमध्ये पीछेहाट होईल, अशी भाजपला भीती होती. या विभागातील ३२ पैकी १७ जागा काँग्रेसने तर १४ जागा भाजपला मिळाल्या. गत वेळच्या तुलनेत भाजपची एकच जागा कमी झाली आहे. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमध्ये कमी जागा मिळू शकतात हे लक्षात आल्यावर भाजपने मध्य गुजरातवर लक्ष केंद्रित केले होते. तेथे ६१ पैकी भाजपने ३७  जागाजिंकल्या.

भाजपच्या यशामागची कारणे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा हे भाजपच्या यशामागील सर्वात मोठे, सर्वात महत्त्वाचे कारण. या निवडणुकीत मोदी लाट नव्हती. पाटीदार समाज, व्यापारीवर्ग दोलायमान होता. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी मैदानात उतरले. १५ दिवसांत ३४ बडय़ा सभा त्यांनी घेतल्या. दुसऱ्या टप्प्यात आपल्या प्रचारकौशल्याच्या जोरावर त्यांनी राज्यातील वातावरण फिरवले.
  • भाजप आणि रा. स्व. संघाचे निवडणूक व्यवस्थापन. जून महिन्यातच त्यांच्या २१ सदस्यीय बूथ समित्या स्थापन झाल्या होत्या. मतदार यादीतील एकेका पानातील ४८ मतदारांसाठी त्यांनी पन्नाप्रमुख नेमला होता.
  • काँग्रेसची भाजपला मदत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसने कमावले ते मणिशंकर अय्यर यांच्या एका विधानाने दुसऱ्या टप्प्यात गमावले.
  • भाजपवर रागावलेला पटेल समाज हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली मोदींना धडा शिकविल असा अनेकांचा कयास होता. परंतु पाटीदारांतील पोटजातींचे समाजकारण आणि उद्योग-व्यवसायातील पटेलांचे भाजपशी जुळलेले हितसंबंध यांमुळे हार्दिकचा फारसा फटका बसला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 3:16 am

Web Title: gujarat election result 2017 gujarat election second phase bjp win in gujarat
Next Stories
1 काँग्रेसने निवडणुकीत जातीयवादाची बीजे रोवली!
2 काँग्रेसच्या खालच्या पातळीच्या प्रचारामुळे भाजपला कमी जागा
3 जनमत चाचण्यांना चकवा
Just Now!
X