गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांना मतदारांनी चकवा दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. दोन्ही ठिकाणी भाजप जिंकले असले तरीही मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविलेल्या जागा जिंकण्यात भाजपला अपयश आले आहे.

वृत्तवाहिन्यांचा पसारा वाढल्यानंतर जनमत चाचण्यांना महत्त्व आले होते. प्रारंभीच्या काळात मतदानापूर्वीच कोणता पक्ष किती जागा जिंकेल याबाबतची आकडेवारी देण्यास विविध वृत्तवाहिन्यांमध्ये चढाओढ दिसून येत होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानावर याचा परिणाम होण्याच्या शक्यतेने मतदान झाल्यानंतरच मतदानोत्तर चाचण्या जाहीर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये मतदान झाल्यानंतर या जनमत चाचण्या विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केल्या.

यापैकी गुजरातमध्ये इंडिया टुडेचा, अ‍ॅक्सिस माय इंडियाचा व झी न्यूज-अ‍ॅक्सिसचा अपवाद सोडला तर इतर वाहिन्यांचा अंदाज सपशेल चुकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. इंडिया टुडे, अ‍ॅक्सिस माय इंडिया व झी न्यूजने भाजपला ९९ ते ११३ जागा, काँग्रेसला ६८ ते ८२ जागा आणि अन्य १ ते ४ जागांचे भाकीत केले होते. याच्या आसपास निकाल लागला. मात्र, टाइम्स नाऊ, इंडिया टीव्ही, एबीपी, न्यूज २४-चाणक्य यांच्या मतदानोत्तर चाचण्यांना मतदारांनी चकवा दिला. टाइम्स नाऊने भाजपला ११३, काँग्रेसला ६६ व अन्य ३ असा अंदाज वर्तविला होता. इंडिया टीव्हीने भाजपला १०४ ते ११४, काँग्रेसला ६५ ते ७५ तर अन्य ४ असा अंदाज वर्तविला होता. एबीपीने भाजपला ११७, काँग्रेसला ६४ जागा वर्तविल्या होत्या. तर न्यूज २४-चाणक्यने भाजपला चक्क १३५ जागा व काँग्रेसला केवळ ४७ जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला होता.

हिमाचलमध्येही अंदाज चुकलेच

  • हिमाचल प्रदेशमध्ये भाजप जिंकले असले तरीही सर्वानीच भाजपला ६८ पैकी ५० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, भाजपला ४१ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाने भाजप ४७ ते ५५ ,काँग्रेस १३ ते २० जागांचा अंदाज वर्तविला होता. तर टाइम्स नाऊने भाजप ५१, काँग्रेस १७ व न्यूज २४-चाणक्यने भाजपला ५५, तर काँग्रेसला १३ जागा मिळणार असल्याचे भाकीत केले होते.