गुजरातमधील निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केले असून क्रोध आणि द्वेषाचे राजकारण कामी येणार नाही, त्यावर प्रेमाने मात करता येते हा संदेशच गुजरातच्या मतदारांनी भाजपला दिल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गुजरातमधील विकासाच्या मॉडलचे मार्केटिंग चांगले झाले होते, मात्र आतून हे मॉडल पोकळ होते. म्हणूनच संपूर्ण निवडणुकीत मोदी विकासावर बोलत नव्हते, असा आरोप त्यांनी केला.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत सलग सहाव्यांदा भाजपने विजय मिळवला असला तरी त्यांना फक्त ९९ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी राहुल गांधी यांनी संसदेबाहेर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले, तीन – चार महिन्यांपूर्वी मी गुजरातमध्ये गेलो त्यावेळी काँग्रेस भाजपशी लढू शकणार नाही असे सांगितले जात होते. पण त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले आणि निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली. आमच्यासाठी हा निकाल चांगला होता. आमचा पराभव झाला, पण आम्ही जिंकू शकलो असतो. त्यात आम्ही थोडे कमी पडलो, असे त्यांनी नमूद केले.

गुजरातमध्ये भाजपला जोरदार झटका बसला आहे. गुजरातमधील जनतेला मोदींचे विकास मॉडेल मान्य नाही. विकासाच्या मॉडेलची मार्केटिंग चांगली होती, मात्र आतून ते मॉडेल पोकळ होते. संपूर्ण निवडणुकीत ते विकासावर काही बोलले नाही, याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधले.
गुजरातच्या जनतेने मला खूप प्रेम दिले, मला एक महत्त्वाची गोष्ट गुजरातने शिकवली. तुमच्या विरोधी पक्षात, लढाईत जेवढा राग, द्वेष, पैसा असेल त्यावर तुम्ही प्रेमाने मात करु शकतो, हे मी या निवडणुकीतून शिकलो, असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीत मोदींच्या भाषणात नोटाबंदी, जीएसटीवर भाष्य नव्हते. त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित झाले असून भ्रष्टाचारावरुन टीका करणारे मोदी राफेल खरेदी आणि जय शहाच्या घोटाळ्यांबाबत गप्प का, असा सवालही त्यांनी विचारला. गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तीन युवा नेत्यांची मोट बांधून भाजपवर त्वेषाने चढाई केली आणि याचा फायदा काँग्रेसला झाला.