गुजरातचा गड राखण्यात भाजपला यश आले असले तरी या विजयावरुन संजय निरुपम यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. संपूर्ण गुजरात भाजपविरोधात होते, गुजरातमध्ये भाजपचा विजय जनतेमुळे नव्हे तर इव्हीएममुळे झाला, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपने विजयी आघाडी घेतली. गुजरातमध्ये भाजप १८२ पैकी १०३ जागांवर आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये ६९ पैकी ४३ जागांवर भाजप आघाडीवर आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन टीका केली. गुजरात भाजपविरोधात होता. नरेंद्र मोदींच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या. हा विजय गुजरातच्या जनतेमुळे नव्हे तर इव्हीएममुळे झाला, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला आधीपासूनच इव्हीएममध्ये फेरफार होणार अशी शंका होती. सर्वांनी सावधान व्हावे, भारतीय लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आयटी तज्ज्ञ मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये पोहोचले आहेत, ते इव्हीएममध्ये फेरफार करत असल्याचा हार्दिक पटेल यांचा आरोप योग्य आहे, असे त्यांनी सांगितले. या निकालातून राहुल गांधींचे मॅजिक कमी झाल्याचे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.