गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत राजकोट पश्चिमेतून भाजपचे विजय रुपाणी भरघोस मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरु यांचा सुमारे २० हजार मतांनी पराभव केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. रुपाणींविरोधात लढण्यासाठी काँग्रेस नेते इंद्रनील राजगुरु यांनी स्वत:चा मतदारसंघ सोडून राजकोट पश्चिममधून हट्टाने उमेदवारी मागितली होती. राजगुरू गेले दीड वर्ष मतदारसंघात जमवाजमव करत होते. राजगुरु यांची १४१ कोटी रुपयांची अधिकृत संपत्तीदेखील होती.

रुपाणी यांच्या मतदार संघात तगडा उमेदवार देऊन रुपाणी यांना मतदार संघातच रोखून ठेवण्याची काँग्रेसची रणनिती होती. यात भर म्हणजे हार्दिक पटेल यांच्या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे रुपाणी यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती.
रुपाणी राज्यात प्रचारात व्यस्त असल्याने त्यांची पत्नी अंजली रुपाणी या पतीसाठी प्रचार करत होत्या. सोमवारी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या सुरुवातीला रुपाणी यांनी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर गेले. त्यामुळे राजकोट पश्चिमेत काँग्रेस जिंकणार की काय अशी शंका उपस्थित झाली. मात्र, त्यानंतर रुपाणी पुनरागमन केले. रुपाणी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले असले तरी १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता रुपाणी यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.