News Flash

गुजरातमध्ये भाजपच्या विजयाची पाच कारणे

पक्षाची बांधणी आणि नियोजन यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी दिलेले आव्हान यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सोपी नव्हती. मात्र या युवा नेत्यांना सामोरे जात भाजपने निवडणुकीत विजय मिळवला. नेमक्या कोणत्या कारणांमुळे भाजपला विजय मिळाला त्याचा घेतलेला हा आढावा…

१. नरेंद्र मोदी
गुजरात म्हणजे नरेंद्र मोदी असे समीकरणच गेल्या काही वर्षात तयार झाले. सलग तीन टर्म मोदींनी गुजरातवर राज्य केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी केंद्रात गेले. मात्र, गुजरातमधील मोदींचा करिष्मा अजूनही कायम आहे. मोदींना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. भाजपकडे पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांची भक्कम फौज असते पण नरेंद्र मोदी नसते तर त्यांना विजय मिळवता आला नसता, असे मोदी समर्थक सांगतात. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे गुजरातमधील व्यापारी वर्ग नाराज होता, मात्र ते कट्टर मोदी विरोधक नव्हते, याकडेही अनेकजण लक्ष वेधतात. यासाठीच मोदींनी राज्यात १५ दिवसांत ३४ सभा घेतल्या. या सभांना गर्दी झाली नसली तरी मतदानात या सभांचा फायदा दिसून आला.

२. पक्षसंघटना आणि नियोजन
नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीने गुजरातमधील पक्षबांधणीवर भर दिला. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची फौजच मैदानात उतरली. एका विधानसभा मतदारसंघासाठी पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी भाजपने उभी केली. मतदार यादीत प्रत्येक पानावर साधारण ४० ते ४५ मतदारांची नावे असतात. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी पानागणिक एक कार्यकर्ता नेमण्यात आला आहे. प्रत्येक बूथसाठी २० ते २२ पानप्रमुख या हिशेबाने एका जागेसाठी सुमारे पाच ते सहा हजार पानप्रमुखांची फळी सज्ज होती. यावरुनन पक्षाची बांधणी आणि नियोजन यावर भर दिल्याने भाजपचा विजय झाला.

३. गुजराती अस्मिता
गुजरातमधील निवडणूक यंदा धर्माएवजी जातीय राजकारणामुळे चर्चेत होती. ओबीसी, दलित आणि पाटीदार समाजातील नेत्यांचा पाठिंबा मिळवून काँग्रेसने निवडणुकीत बाजी मारण्याचे मनसुबेही रचले. मात्र चाणाक्ष मोदींनी गुजराती अस्मितेचा मुद्दा मांडून मतदारांना भावनिक साद घातली. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे मतदारांमध्ये नाराजी असल्याची जाणीव मोदींनाही झाली असावी. त्यांनी गुजराती अस्मितेवरच भर दिला. राहुल गांधी हे गुजराती विरोधी असल्याचा प्रचार भाजपने केला. त्यामुळे जात आणि धर्माऐवजी भाजपची गुजराती अस्मिता मतदारांना भावली. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरल्याने यात भर पडली.

४. सुशासन
गुजरातमध्ये शेतकरी वर्ग नाराज होता, तरुणांमध्येही नाराजी होती, विविध जातींमधील मतदार दुखावला होता. पण त्यानंतरही भाजपने निवडणुकीत यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसाठी काम करतात आणि प्रशासनावर त्यांची मजबूत पकड असल्याचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे व्यापारी व उद्योजक वर्ग भाजपविरोधात गेला नाही. भाजपविरोधात गेल्यास फटका बसेल, या विचाराने त्यांनी देखील भाजपला मतदान केले असावे, असे अंदाज वर्तवला जातो.

५. विचारधारा
गुजरातमध्ये भाजपचा मतदारांशी संपर्क असून गुजराती मतदार भाजप आणि त्यांच्या धोरणावर नाराजी होते. मात्र त्यांचा भाजपच्या विचारधारेला विरोध नव्हता. भाजपच्या प्रचाराला धार्मिक धार देत भाजपने हिंदू मतांना आकर्षित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 8:01 pm

Web Title: gujarat election results 2017 five reasons why bjp won in gujarat narendra modi ideology gujarati pride
Next Stories
1 क्रोधाशी कडवी झुंज देत काँग्रेसने स्वाभिमान जपला- राहुल गांधी
2 Gujarat Election result 2017 : ‘राहुल गांधींना पाहून इंदिरा गांधींची आठवण झाली’
3 हिमाचलमध्ये भाजपची सत्ता, पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारच पराभूत
Just Now!
X