गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपला यश आले असून आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला अशा दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे विजय रुपाणी यांनाच दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर संधी दिली जाईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

सलग २२ वर्षांच्या सत्तेमुळे जनमानसात निर्माण झालेले प्रस्थापिताविरोधी सूक्ष्म प्रवाह, आरक्षणासाठी प्रक्षुब्ध झालेला शक्तिशाली पटेल समाज, वस्तू आणि सेवा करामुळे व्यापाऱ्यांमधील नाराजी आणि हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर व जिग्नेश मेवाणी या तीन युवकांची मोट बांधून राहुल गांधी यांनी प्रथमच त्वेषाने केलेली चढाई या साऱ्यांचे आक्रमण परतवून लावत भाजपने गुजरातचा गड राखण्यात यश मिळवले. १९९५ पासून सलग २२ वर्षे राज्य करणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक सर्वात कठीण मानली जात होती. २०१२ मध्ये ११६ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा ९९ जागांवरच समाधान मानावे लागले. गुजरातचा गड राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना यश आले असले तरी मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची असा पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. नेतृत्वगूण आणि नरेंद्र मोदींच्या गोटातील नेत्या असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. तर स्मृती इराणींनी हे वृत्त फेटाळले आहे. मी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र मोदी- शहा या जोडीचे धक्कातंत्र पाहता स्मृती इराणींना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मनसूख लाल मांडवीय हे देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. मांडवीय हे सौराष्ट्रातील नेते असून ते पाटीदार समाजातून येतात. गुजरातमधील शेतकऱ्यांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. कर्नाटकचे राज्यपाल आणि गुजरात विधानसभेचे माजी सभापती वजूभाई वाला यांचे नावही चर्चेत आहे. वाला यांनी यापूर्वी गुजरातमध्ये अर्थ, कामगार आणि रोजगार विभागाची जबाबदारी सांभाळली होती.

तीन दिग्गज नेते स्पर्धेत असले तरी दुसरीकडे विजय रुपाणी यांनाच पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी देखील चर्चा आहे. विजय रुपाणी यांनी राजकोट पश्चिम या मतदार संघातून विजय मिळवला आहे. १५० जागांचे लक्ष्य गाठण्यात त्यांना अपयश आले असले तरी तूर्तास त्यांनाच पुन्हा संधी देण्याचा निर्णय भाजपचा नेतृत्व घेऊ शकते. मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.