गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल सोमवारी (आज) काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार असतानाच सुरतमध्ये काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेसने रविवारी रात्री ७७ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने पाटीदार समितीचे कार्यकर्ते नाराज असून सुरतमधील काँग्रेस कार्यालयात काम होऊ देणार नाही असा इशाराच पाटीदार समितीने दिला आहे. त्यामुळे आता हार्दिक पटेल पाठिंबा जाहीर करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास पटेलांना आरक्षण देण्याबाबत काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये (पास) एकमत झाल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. या आरक्षणाबाबतचे तपशील आणि निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत ‘पास’ची भूमिका यासंदर्भात हार्दिक पटेल सोमवारी राजकोटमधील सभेत घोषणा करतील असेही ‘पास’चे संयोजक दिनेश भंभानिया यांनी सांगितले होते. मात्र रविवारी रात्री काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ७७ उमेदवारांची यादी जाहीर केली आणि वादाची ठिणगी पडली.

सुरतमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असलेल्या वरच्चा रोड या मतदारसंघातून काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली. रात्री उशिरा पाटीदार आंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रफुल्ल तोगडिया यांच्या कार्यालयाबाहेर जमले. काँग्रेस कार्यकर्ते आणि पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. तिकीट वाटप करताना पाटीदार समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली, असा आरोप भंभानिया यांनी केला. आम्ही काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ला करुन विरोध दर्शवणार, असा इशाराच त्यांनी दिला. जागावाटपात जोपर्यंत ‘पास’ला योग्य स्थान मिळणार नाही तोपर्यंत सुरतमधील काँग्रेसच्या कार्यालयातून काम होऊ देणार नाही, असे सुरतमधील ‘पास’चे नेते धर्मिक मालवीय यांनी सांगितले.

पाटीदार आंदोलन समितीने पाच जागांवरुन निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत राजकोटमधील धोराजीतून ललित वसोया आणि जुनागडमधून अमित थुम्मार यांना तिकीट देण्यात आले आहे. हे दोघेही ‘पास’चे नेते असून उमेदवारी देताना पासच्या कोअर कमिटीला विश्वासात घेतले नाही, असा आरोप आहे.

दरम्यान, दुपारी ‘पास’ नेत्यांची आणि काँग्रेसची बैठक पार पडली होती. या बैठकीत काँग्रेसचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तर हार्दिक पटेल मात्र या बैठकीत उपस्थित नव्हता. सोमवारी हार्दिक पटेल पाठिंब्याबाबत अधिकृत घोषणा करणार, असे बैठकीत ठरले होते. मात्र रविवारी रात्रीच्या घटनेनंतर हार्दिक पटेल सोमवारी घोषणा करणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.