गौतम बुद्धांप्रमाणे घरदार सोडणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मायभूमीत जातीपातीवरुन मतदान करणे हे पाप आणि अनैतिक ठरेल, असे भाजपचे खासदार परेश रावल यांनी म्हटले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकोट येथे जनसभेला संबोधित करताना रावल यांनी मोदींची तुलना गौतम बुद्धांशी केली. ‘तुमचा मुलगा भविष्यात कसा व्हायला हवा ? पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा की राहुल गांधींसारखा?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.

‘त्यांच्यासारखी (मोदींसारखी) व्यक्ती सापडणं अवघड आहे. मोठ्या पूजा आणि प्रार्थनेनंतरच अशी व्यक्ती मिळते. राजकारणातून अशी अवतारी व्यक्ती निर्माणच होऊ शकत नाही. गौतम बुद्धांप्रमाणे स्वत:च्या कुटुंबाला सोडून देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भूमीत जातीपातीच्या नावावरुन मतदान करणे हे कृतघ्नपणाचे ठरेल,’ असे रावल म्हणाले. ‘गुजरात विधानसभा निवडणुकीत धर्मपंथाच्या नावावरुन मतदान केल्यास, ते पाप असेल आणि आपण ते करु शकत नाही. आपण सरदार पटेल आणि महात्मा गांधींच्या भूमीतील लोक आहोत,’ असेही त्यांनी म्हटले.

‘देवाकडे प्रार्थना करा. तुमच्या कुलदैवताचे स्मरण करा. तुमच्या पालकांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दिलेल्या मूल्यांचे स्मरण करा. तुमचा हात छातीवर ठेवा आणि तुमचा मुलगा भविष्यात कसा झालेला आवडेल हे स्वत:लाच विचारा. तुमचे मूल पंतप्रधान मोदींसारखे झालेले आवडेल की राहुल गांधींसारखे? हा प्रश्न तुम्ही अंतरात्म्याला विचारुन पाहा. तुम्हाला जे उत्तर मिळेल, त्या व्यक्तीला मतदान करा,’ असे परेश रावल म्हणाले. काँग्रेसकडून पाटीदार नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेते अल्पेश काठोर आणि दलित नेते जिग्नेश यांचा वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींची राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरु असल्याचेही ते म्हणाले.